दुष्काळ हटू दे, पाऊस पडू दे...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

दुष्काळी स्थितीतून मुक्ती मिळण्यासाठी मोठा पाऊस पडू दे, असे साकडे घालत शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी रविवारी (ता.एक) अहमदनगर रोडवरील ईदगाह मैदानावर विशेष सामुदायिक नमाज अदा केली

भूम (जि.उस्मानाबाद) ः सलगच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. त्यामुळे दुष्काळी स्थितीतून मुक्ती मिळण्यासाठी मोठा पाऊस पडू दे, असे साकडे घालत शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी रविवारी (ता.एक) अहमदनगर रोडवरील ईदगाह मैदानावर विशेष सामुदायिक नमाज अदा केली


गेल्या दहा वर्षांपासून भूम तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी या भागातील नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहेत. जनावरांना पिण्याचे पाणी, चारा उपलब्ध नसल्याने पशुधन कसे सांभाळायचे असा प्रश्‍न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

चारा, पाण्याअभावी मुक्‍या जनावरांचे हाल होत असल्याने शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी शुकवारी (ता.30) नमाज अदा करीत मोठ्या पावसासाठी प्रार्थना केली; तसेच रविवारी ईदगाह मैदानावर पशुधनाला सोबत आणून मुबलक पावसासाठी नमाज अदा करून प्रार्थना केली. ही प्रार्थना सलग तीन दिवस करणार असल्याचेही मुस्लिम समाजातील नागरिकांनी सांगितले. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Drought