अरविंद गोरे यांच्या पॅनेलची पुन्हा बाजी

तानाजी जाधवर
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

सर्व जागा जिंकून अरविंद गोरे यांच्या पॅनेलने केशेगाव (ता. उस्मानाबाद) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यावर एकहाती सत्ता कायम राखली आहे.

उस्मानाबाद : केशेगाव (ता. उस्मानाबाद) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्व 21 जागा जिंकून संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांच्या पॅनेलने एकहाती सत्तेचे वर्चस्व कायम राखले आहे. चित्राव गोरे, अतुलसिंह बायस यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रतिस्पर्धी व्यंकट गुंड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी बचाव, कारखाना बचाव या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी कारखान्याची स्थापना 2000 मध्ये झाली. कारखान्यावर 2001 पासून गोरे यांच्याच पॅनेलची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. नऊ) शांततेत मतदान झाले. तत्पूर्वी बिनविरोध झालेल्या दोन जागा सत्ताधारी पॅनेलच्या पारड्यात गेल्या होत्या. उर्वरित 19 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात होते.

हेही वाचा - ‘आरईटी’ अंतर्गत १२४ शाळांची नोंदणी

आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. दुपारी बाराच्या सुमारास पाच गटांतील पंधरा जागांचा निकाल जाहीर झाला. केशेगाव, चिखली, बेंबळी, तेर व उस्मानबाद गटांमध्ये सरासरी दीड हजाराच्या फरकाने सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळविला. पाठोपाठ अन्य चौदा जागांचे निकाल जाहीर झाले. अरविंद गोरे यांना तीन हजार 684 पैकी दोन हजार 623 मते मिळाली. 

कारखान्याच्या पहिल्या (2001) निवडणुकीपासून व्यंकट गुंड यांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. संस्थापक संचालक म्हणून काम पाहिलेल्या व्यंकट गुंड यांचे गोरे यांच्यासोबत मतभेद झाले. तेव्हापालून त्यांनी विरोध करायला सुरवात केली. प्रयत्न करूनही गुंड यांना शेतकरी सभासद कौल देत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यंदाही मतांच्या मोठ्या फरकाने गुंड यांच्या पॅनेलचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले. 

हेही वाचा - प्रेमाचा दिवस येतोय जवळ, बाजारपेठ झाली गुलाबी !

यावेळी कमीत कमी खर्च व गाजावाजा न करता ही निवडणूक लढविण्यात आली. सत्ताधारी लोकांवर शेतकरी सभासदांचा विश्‍वास कायम असल्याचे याही निवडणुकीत स्पष्ट झाल्याचे विजयी पॅनेलकडून सांगण्यात आले. आमच्या उमेदवारांनी चांगले मतदान खेचण्याचा प्रयत्न केला. एकतर्फी लढत म्हणणाऱ्यांसाठी हा नक्कीच धक्का असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. 

विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते) 
केशेगाव गट ः अरविंद गोरे (2623), हनुमंत काळे (2576), लिंबराज लोकरे (2543). 
उस्मानाबाद गट : फत्तेसिंह देशमुख (2590), दिलीप गणेश (2566), नामदेव पाटील (2539). 
तेर गट : अविनाश हाऊळ (2629), शिवाजीराव नाईकवाडी (2601), आयुबखॉं पठाण (2556). 
बेंबळी गट : नीलेश पाटील (2621), राजेश पाटील (2588), शंकर सुरवसे (2570). 
चिखली गट : ज्ञानेश्वर बाकले (2598), अभिजित माने (2609), कुंद पाटील (2597). 
अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ : सुग्रीव कांबळे (2523). 
महिला राखीव ः अश्विनी पाटील (2656), वर्षा पाटील (2610). 
इतर मागासवर्गीय मतदारसंघ : विलास भुसारे (2660). 

पराभूत उमेदवार 
भुजंग चव्हाण (1026), गणपती कोळगे (1013), ज्ञानदेव राजगुरू (988), पोपट भोसले (1034), चांगदेव माने (1041), सुधाकर पाटील (995) 
दिलीप भोसले (1022), सूर्यकांत लाकाळ (1012), गोपाळ पौळ (1006), व्यंकट गुंड (1066), मोहन सूर्यवंशी (1016), अंकुश तानवडे (1005), बालाजी भोसले (1028), संजय कदम (971), अनिल पवार (1006), सहदेव ढाकरे (1173), सुनीता गायकवाड (1007), सुनीता पवार (972), गोपाळ नळेगावकर (1041). 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Election