esakal | औरंगाबादमध्ये हायमास्टमधून वसतिगृहासाठी वीजचोरी
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

विजयनगरातील प्रकार; नगरसेवकाची आयुक्तांकडे तक्रार 

औरंगाबादमध्ये हायमास्टमधून वसतिगृहासाठी वीजचोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - शहरातील पथदिव्यांचे महापालिका कोट्यवधी रुपयांचे वीजबिल भरते; मात्र अनेक ठिकाणी पथदिव्यांच्या खांबावरून वीजचोरी होत असून, असाच प्रकार विद्यानगर वॉर्डातील विजयनगरात परिसरात नुकताच उघडकीस आला आहे. वीजचोरी समोर आल्यानंतर प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणे अपेक्षित असताना विद्युत विभाग संबंधितास पाठीशी घालत आहे. त्यामुळे नगरसेवक राजू वैद्य यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. 

शहरात सुमारे 60 हजार पथदिवे असून, या पथदिव्यांच्या बिलापोटी कोट्यवधी रुपयांचे बिल महापालिका भरते; मात्र अनेक भागांत पथदिवे, हायमास्टमधून विजेची चोरी केली जात आहे. असाच प्रकार नुकताच समोर आला आहे. विद्यानगर वॉर्डातील विजयनगर भागात नगरसेवक राजू वैद्य यांनी हायमास्ट उभारले आहे. काही दिवसांतच हायमास्ट नादुरुस्त झाला. नागरिकांच्या तक्रारीनंतर श्री. वैद्य यांनी हायमास्ट दुरुस्तीसाठी विद्युत विभागाचे उपअभियंता के. डी. देशमुख यांना कळवले.

श्री. देशमुख हे कर्मचाऱ्यांसह हायमास्टच्या दुरुस्तीसाठी गेले असता, हायमास्टमधून वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले. ही वीजचोरी एका खासगी वसतिगृहासाठी केली जात होती. वीजचोरी समोर आल्यानंतर संबंधिताच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र उपअभियंता के. डी. देशमुख यांनी वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यास नकार देत वसतिगृहचालकास पाठीशी घातले. हा प्रकार समोर येताच श्री. वैद्य यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे तक्रार केली. यासंदर्भात श्री. देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

loading image
go to top