जीएसटीला 50 कोटींचे अभय

प्रकाश बनकर
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतून करसंकलनाचे काम करण्यात येते. या तीनही जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांकडे 2010 पासून थकीत कर होता. तो वसुलीसाठी जीएसटीच्या मुख्य कार्यालयातर्फे अभय योजना राबविण्यात आली.

औरंगाबाद - वस्तू व सेवाकर विभागाने व्यापाऱ्यांकडून थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविली होती. दोन टप्प्यांत राबविण्यात आलेल्या या योजनेतून 50 कोटींचा कर वसूल झाला आहे. 2010 पासून थकीत करदात्यांकडून ही वसुली करण्यात जीएसटी कार्यालयास यश मिळाले आहे. यासाठी औरंगाबाद जीएसटी कार्यालयाची संपूर्ण यंत्रणा कामाला
लागली होती. तेव्हाच ही वसुली झाली आहे. 

राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतून करसंकलनाचे काम करण्यात येते. या तीनही जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांकडे 2010 पासून थकीत कर होता. तो वसुलीसाठी जीएसटीच्या मुख्य कार्यालयातर्फे अभय योजना राबविण्यात आली. कर, व्याज शास्ती आणि विलंब शुल्क तडजोड देत थकीत कर भरण्याची सुविधा व्यापाऱ्यांना दिली होती. या योजनेची औरंगाबादच्या कार्यालयातील सर्वच अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. त्यामुळे अभय योजनेच्या माध्यमातून 3 हजार 895 व्यापाऱ्यांपर्यंत पोचण्यात जीएसटीला यश आले. 

जीएसटी लागू झाल्यानंतर एक देश - एक करप्रणाली झाली. इतर सर्व कर रद्द होऊन वस्तू व सेवाकर देशभरात लागू झाला. या कराच्या माध्यमातून सर्व व्यवहार पारदर्शकपणे करण्यात येत आहेत. अभय योजनेंतर्गत नोंदीत व अनोंदीत व्यापाऱ्यांकरिता बीएसटी, व्हॅट, सीएसटी, पीटी आदी 11 कायद्यांतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात लाभ देण्यात आले.

अभय योजनेतील पहिला टप्पा एक एप्रिल ते 31 जुलैपर्यंत होता. दुसरा 1 ते 31 ऑगस्टदरम्यान राबविण्यात आला. योजनेसाठी औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतून पहिल्या टप्प्यात दोन हजार 422 व्यापाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यासह योजनेतून 35 कोटींचा कर तर दुसऱ्या टप्प्यात 15.97 कोटींचा कर वसूल झाला. 
 
जीएसटी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला फळ 
जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यकर जीएसटीच्या टीमने दिवसरात्र मेहनत घेऊन अंमलबजावणी केली. यासह व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवत त्यांना ही प्रणाली समजावूनही सांगितली होती. त्यावेळी जीएसटीच्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र विशेष कौतुकही झाले होते. त्याच पद्धतीने अभय योजनेसाठी राज्यकर जीएसटीच्या
अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या कामामुळे थकीत कर वसूल झाला आहे. 

हेही वाचा : प्रबोधनकार ते आदित्य, ठाकरे कुटुंबातील चौथी पिढी काय करते? वाचा.... 

काय आहे अभय योजना? 

  • पहिला टप्पा : या योजनेअंतर्गत एक एप्रिल 2010 ते 30 जून 2017 पर्यंत कर, व्हॅट थकबाकीदारांना सवलत मिळणार आहे. यात विवादित कर 31 मार्च ते जून 2010 पर्यंतच्या कालावधीतील भरल्यास थकीत विवादित कर 50 टक्‍के, तर व्याज 90 टकके, थकीत शास्ती 95 टक्‍के माफ करण्यात आली. एप्रिल 2010 ते 30 जून 2017 पर्यंत थकीत विवादित करात 30 टक्‍के सवलत, 80 टक्‍के व्याज, 90 टक्‍के थकीत शास्तीची माफी देण्यात आल 
  • दुसरा टप्पा : 31 मार्च 2010 पर्यंत थकीत विवादित कर 40 टक्‍के, थकीत व्याज 80 टक्‍के आणि थकीत शास्ती 90 टक्‍के माफ करण्यात आली. तर 1 एप्रिल 2010 ते 30 जून 2017 पर्यंत थकीत विवादित कर 20 टक्‍के, थकीत व्याज 70 टक्‍के, थकीत शास्ती 80 टक्‍के माफ करण्यात आली आहे. मुंबई विक्रीकर, मूल्यवर्धित कर, केंद्रीय कर, व्यवसाय कर अशा 11 कायद्यांतर्गत ही योजना राबविण्यात आली होती. 

 
अशी झाली वसुली 

  • पहिला टप्पा : 2 हजार 422 व्यापाऱ्यांकडून 35 कोटींचा कर वसूल (एक एप्रिल ते 31 जुलै 2019) 
  • दुसरा टप्पा : 1 हजार 473 व्यापाऱ्यांकडून 15 कोटी 97 लाखांचा कर वसूल (एक ते 31 ऑगस्ट 2019) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About GST Abhay Yojana