नाईटलाईफने निद्रानाशाला आमंत्रण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

तंत्रज्ञानाच्या विकासाने गती दिली असली तरी त्याच्या झपाट्यात बदलत्या जीवनशैलीने आरोग्य धोक्‍यात आले आहे. फॅशन आणि नाईटलाईफचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या गप्पा, मित्रांसोबतची सैर, पार्ट्यांची हौसमौज करताना दिनक्रमाचा चुराडा होतोय. त्यामुळे निद्रानाशाला आमंत्रण मिळत असल्याचे मनोविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद - तंत्रज्ञानाच्या विकासाने गती दिली असली तरी त्याच्या झपाट्यात बदलत्या जीवनशैलीने आरोग्य धोक्‍यात आले आहे. फॅशन आणि नाईटलाईफचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या गप्पा, मित्रांसोबतची सैर, पार्ट्यांची हौसमौज करताना दिनक्रमाचा चुराडा होतोय. त्यामुळे निद्रानाशाला आमंत्रण मिळत असल्याचे मनोविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

टीव्ही, इंटरनेटचे वाढत चाललेले मायाजाल, सहज उपलब्धता, मोबाईल, सोशल मीडियाचा अतिवापर, जीवनमान उंचावल्याने निर्माण झालेली स्पर्धा आणि घरातील घरपण हरवत असल्याचे चित्र सर्वत्रच पाहायला मिळत आहे. कॉलेजच्या कट्ट्यांवर, कार्यालयांत, घरात, कामाच्या ठिकाणी सर्वांची डोकी मोबाईलमध्ये असल्याचे चित्र आता सवयीचे झालेले आहे. यातून चॅटिंग होतेय; मात्र प्रत्यक्ष संवाद तुटल्याचे प्रकर्षाने जाणवते. टीव्ही पूर्वीही होते. मात्र, सध्याचा वापर कित्येक पटीने वाढला आहे. यात जेवण, व्यायाम याकडे दुर्लक्ष. व्यसनांचे दुष्परिणाम वाढल्याने परिणामी झोपेच्या समस्यांना आमंत्रण दिले जात आहे. शारीरिक कसरत, व्यायाम मैदानी खेळ लहानपणापासूनच दुर्लक्षित होत चालल्याचेही आलेल्या रुग्णातून समोर येत असल्याचे घाटीतील मनोविकारशास्त्र विभागाच्या डॉक्‍टरांनी सांगितले. 
 
मुलांना गॅझेटच्या सान्निध्यात रात्री उशिरापर्यंत जागू देऊ नका 
नुकताच माझ्याकडे नववीतला मुलगा अॅडमिट झाला होता. तो रात्रभर पब्जी नावाचा इंटरॅक्‍टिव्ह गेम खेळायचा आणि दिवसभर झोपायचा. आठ महिने चक्र सुरू होते. तरी घरच्या कुणाच्या लक्षात आले नाही. प्रिन्सिपलने त्याच्या या घटना नोट केल्यावर प्रकरण घरच्यांच्या लक्षात आले. गेम ऍडिक्‍शन होते. त्यातून डिप्रेशनही येऊ शकते. पालकांनीच रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा खेळ थांबवला पाहिजे म्हणजे मुले अनुकरण करणार नाहीत. मुले रात्री गॅझेटच्या सान्निध्यात जागताहेत हे सहज घेऊ नका, असा सल्ला मनोविकारतज्ज्ञ डॉ. माणिक भिसे यांनी दिला. 
  
 

चिंता, उदासीनता, स्पर्धा, ताणतणाव, कमी वेळात खूप काही करण्याची चढाओढ आणि झोपेकडे झालेले दुर्लक्ष स्ट्रेसलेव्हल वाढवते. मग चिडचिड होते. कामात लक्ष लागत नाही. उच्च रक्‍तदाब, मधुमेहाचा त्रासही यातून उद्भवतो. शिवाय अपचन, ऍसिडिटी होते. 
- डॉ. प्रदीप देशमुख, विभागप्रमुख, मनोविकारशास्त्र विभाग, घाटी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Insomnia