सावरकरांना भारतरत्न म्हणजे शहिदांचा अपमान : कन्हैय्याकुमार

अनिल जमधडे
Thursday, 17 October 2019

सत्ताधाऱ्यांची नीती, नियत चांगली नाही
 

औरंगाबाद : "स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची भाषा भाजप करत आहे. भारतरत्न पुरस्कार स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या शहीद भगतसिंग यांना दिला पाहिजे. ज्या सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, त्या सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देणे हा शहिदांचा अपमान आहे. सावरकरांना भारतरत्न दिला तर भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कार देऊ नका'', असे प्रतिपादन युवा नेता डॉ. कन्हैयाकुमार यांनी केले. 

आमखास मैदान येथे गुरुवारी (ता. 17) औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाकप आणि डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार ऍड. अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ कन्हैय्याकुमार यांची सभा झाली. यावेळी अण्णासाहेब खंदारे, प्रा. राम बाहेती, अश्‍फाक सलामी, सांडू जाधव, भाऊसाहेब झिरपे, ऍड. मनोहर टाकसाळ, सुभाष लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कन्हैयाकुमार म्हणाले, ""सावरकरांना भारतरत्न देण्याची भाषा करणाऱ्यांनी शहराच्या सावरकर चौकातील रस्ता खड्डेमुक्त करावा. शहराच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. समांतर पाणीपुरवठा योजना तीनशे कोटींवरून सोळाशे कोटींवर गेली. ठेकेदार आणि नेत्यांची मिलबाटकर खायेंगे ही नीती आहे. राज्यात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा ज्वलंत प्रश्नांना बगल देत भाजप-शिवसेनेचे नेते काश्‍मीर, राममंदिरच्या नावावर मते मागत आहेत. आदिवासी, शेतकरी, सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात आमची लढाई सुरू आहे. लढाई बंद कमरे में नहीं मैदान में लढी जाती है, म्हणूनच सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरलो'', असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने किती अश्‍वासने पूर्ण केले यावर कुणी बोलत नाही, कारण मतदारांचे लक्ष जाती धर्मावर वळवण्यात आले. जाहिरातीच्या हॅमरिंगचा फंडा सत्ताधाऱ्यांनी अवलंबिला आहे. सत्ताधाऱ्यांची नीती, नियत चांगली नाही. जाती, धर्माच्या नावावर मतदान करण्यापेक्षा जबाबदार नागरिक म्हणून मतदान करावे, पैसे घेऊन मतदान करू नका, स्वतःला हजार रुपयांत विकू नका, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी केले. कम्युनिस्टांची ताकद काय आहे? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. कम्युनिस्टांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात प्राणाची आहुती दिली हा इतिहास आहे. सत्ता मिळेल किंवा नाही; मात्र कम्युनिस्ट जनतेच्या प्रश्नांसाठी कायम रस्त्यावर आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. सभेपुर्वी कन्हैयाकुमार यांचा शहरातून रोड शो करण्यात आला. उमेदवार ऍड. अभय टाकसाळ यांनी भूमिका स्पष्ट केली. भास्कर लहाने यांनी सूत्रसंचालन केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about kanhaiya kumar