मूत्रपिंडविकारची इमारत पडणार अडगळीत 

Ghati_Hospital
Ghati_Hospital

औरंगाबाद - घाटी रुग्णालयात पाच वर्षांपूर्वी नऊ कोटी रुपये खर्चून मूत्रपिंडविकार व मूत्रपिंडरोपण विभागासाठी अद्ययावत इमारत बांधली; मात्र मनुष्यबळ व यंत्रसामग्रीच न मिळाल्याने येथे अद्यापपर्यंत डायलिसीसशिवाय इतर उपचार उपलब्ध झाले नाहीत. दरम्यान, हे उपचारही आता सुपरस्पेशालिटी विंगमध्ये केले जाणार असल्याने या विभागासाठी उभारलेली इमारतही आता पुन्हा अडगळीत पडणार आहे. या इमारतीचा वापरच करायचा नव्हता; तर इमारत बांधण्याचा अट्टाहास का झाला, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

घाटीत शवविच्छेदन विभागाजवळ बांधण्यात आलेल्या दोन मजली प्रशस्त इमारतीत फेब्रुवारी 2014 मध्ये मूत्रपिंडविकार व मूत्रपिंडरोपण विभाग सुरू करण्यात आला; मात्र गेली पाच वर्षं मनुष्यबळच न मिळाल्याने डायलिसीस शिवाय इतर कोणतेही उपचार या इमारतीत मिळू शकले नाहीत. आतापर्यंत केवळ पहिला अर्धा मजलाच वापरात राहिल्याने ही इमारत केवळ पांढरा हत्ती ठरली. यासाठी 38 पदांचा प्रस्ताव गेली पाच वर्षे रेंगाळला. दरम्यान, सुपरस्पेशालिटी विंगची निर्मिती सुरू झाली. या विंगमध्ये युरॉलॉजी आणि नेफ्रालॉजी या दोन्ही सुपरस्पेशालिटी उपचारांची सुविधा करण्यात आली. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी बांधलेली ही प्रशस्त इमारत आता पुन्हा वापराविना राहण्याची शक्‍यता आहे. एकीकडे विभागांना जागा नाही; तर दुसरीकडे मनुष्यबळ नसताना नव्या इमारती उभारण्याचा घाट कशासाठी घालण्यात आला असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. सुपरस्पेशालिटीचेही 90 टक्के बांधकाम पूर्ण होत आले; मात्र वर्षभरापासून या इमारतीच्या मनुष्यबळालाही प्रतीक्षा कायम आहे. 
 
खासगीशिवाय पर्याय नाही 

पिण्यात येणारे अधिकचे क्षारयुक्त पाणी आणि बदलत्या जीवनशैलीतील चुकीच्या सवयीमुळे आजाराला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे मूत्रपिंडविकार व मूत्रपिंडरोपणाला समोरे जावे लागण्याऱ्या रुग्णांतही पन्नास टक्के वाढ झाल्याचे मूत्रपिंडविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, घाटी रुग्णालयात सुविधा आणि मनुष्यबळ न मिळाल्याने किडनीविकाराच्या रुग्णांना खासगी रुग्णालयांची वाट धरण्याशिवाय सध्यातरी पर्याय नाही. 
 

सध्या केवळ डायलिसीसची सेवा सुरू आहे. सुपरस्पेशालिटीत हा विभाग सुरू होईल. पूर्वी 38 पदांची मागणी होती आता. त्यासाठी 30 पदांचा प्रस्तावही देण्यात आलेला आहे. रिकाम्या झालेल्या त्या इमारतीत नेत्र किंवा कान-नाक-घसा विभाग सुरू करण्यासाठी चाचपणी केली आहे; मात्र सुपरस्पेशालिटी विभाग सुरू होईपर्यंत कोणतेही बदल होणार नाहीत. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com