सरकारविरोधातील आंदोलन भाजपच्या अंगलट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले; मात्र कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यालाच कोरा सातबारा दिल्याने हे आंदोलन भाजपच्या अंगलट आले आहे.

उस्मानाबाद : कर्जमाफीच्या मुद्यावरून महाआघाडी सकारच्या विरोधात भाजपच्या जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले; मात्र कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यालाच कोरा सातबारा दिल्याने हे आंदोलनच भाजपच्या अंगलट आले आहे.

महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली; तसेच सोमवारी पहिली यादी जाहीर झाली असून, कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी पुढील प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्यानंतरही भाजपच्या वतीने मंगळवारी (ता. २५) राज्यात कर्जमाफीच्या मुद्यावर आंदोलन सुरू करण्यात आले. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी भाजपचे कार्यकर्ते आंदोलनासाठी जमले होते; मात्र हेच आंदोलन भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चांगलेच आंगलट आले.

क्लिक करा- दूध संकलन केंद्रांवर छापे, आष्टीत भेसळयुक्त दूधाचा गोरखधंदा

महाआघाडीकडून सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिल्याने त्याच मुद्याला धरून भाजपच्या वतीने प्रतीकात्मक स्वरूपात काही शेतकऱ्यांना पूर्णपणे कोरा सातबारा देण्याचे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे कर्जच नाही, अशा शेतकऱ्यांना कोरा सातबारा देण्यात आला. दरम्यान, त्याच वेळी माध्यम प्रतिनिधींनी संबंधित शेतकऱ्याकडे जाऊन चौकशी केली तेव्हा संबंधित शेतकऱ्याने कर्जच नसल्याचे सांगितल्याने हे आंदोलन भाजपच्याच अंगलट आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली. 

आंदोलनातील मागण्या 
अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी आघाडीच्या सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती; मात्र सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर पडल्याचेही भाजप नेत्यांनी यावेळी सांगितले. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार नाही; तसेच अनेक शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, अशा चालू बाकीदार शेतकऱ्यांना शासनाने वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.

तूर खरेदी, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आदी विषयांवरही महाआघाडी सरकारला विसर पडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, ॲड. मिलिंद पाटील, उपाध्यक्ष अॅड. नितीन भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about osmanabad