बाभळगाव (ता. तुळजापूर) : आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना तहसीलदार सौदागर तांदळे. या वेळी शेतकरी अॅड. सुधाकर दुधभाते, अरविंद घोडके आदी.
बाभळगाव (ता. तुळजापूर) : आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना तहसीलदार सौदागर तांदळे. या वेळी शेतकरी अॅड. सुधाकर दुधभाते, अरविंद घोडके आदी.

शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन मागे

अणदूर (जि. उस्मानाबाद) : प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे धनगरवाडी (ता. तुळजापूर) येथील शेतकऱ्यांनी शिवरस्त्यासाठी पुकारलेले जलसमाधी आंदोलन बुधवारी (ता. चार) मागे घेण्यात आले. दरम्यान, पळस निलेगाव तलाव परिसरात प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांकडून सततच्या रस्ता अडवणुकीने त्रस्त झालेल्या धनगरवाडी येथील ४३ शेतकऱ्यांनी शिवरस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी २७ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने बुधवारी धनगरवाडी व पळस निलेगाव (बाभळगाव) तलाव परिसरात तणावाचे वातावरण होते. परंतु तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी व्ही. व्ही. कोल्हे, शेतकरी संघटनेचे अरविंद घोडके व आंदोलक शेतकरी यांच्यामध्ये अतिक्रमणित रस्ता मोकळा करुन देण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अतिक्रमण झालेल्या रस्त्यालगतच्या शेतीची मोजणी तत्काळ करुन रस्ता मोकळा करुन देऊ, असे सांगितल्यानंतर प्रशासनावर विश्वास ठेवून आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. परंतु तातडीने हा प्रश्न निकाली काढावा, दररोज होणाऱ्या जाचातून मुक्त करावे, अशी अपेक्षा पिडीत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 
या वेळी बिरु दुधभाते, शिवाजी चव्हाण, मल्लिनाथ घोडके, अॅड. सुधाकर दुधभाते, नवनाथ दुधभाते, बळी घोडके, मल्लिनाथ बनछेरे या प्रमुख आंदोलकांसह पिडीत शेतकरी उपस्थित होते.

आंदोलनस्थळी पोलिस निरीक्षक वैभव नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली दंगल नियंत्रण पथक, आपत्ती व्यवस्थापनची संपूर्ण टिम, दरोडा प्रतिबंधक पथक, धनगरवाडी व फुलवाडी टोल प्राधिकरणाचे सुरक्षा कर्मचारी, रुग्णवाहिका, महामार्ग सुरक्षा रक्षक, तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षारक्षक व तुळजापूर, नळदुर्ग, तामलवाडी येथील पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे तलाव परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. 

या प्रकरणाची फाईल २०१८ पासून बंद होती. हे प्रकरण हे अर्धन्यायिक असल्याने शिवाय मी नव्याने येथे आलो असल्याने सर्व बाबी तपासून पिडीत शेतकऱ्यांना रस्ता मोकाळा करुन देणार आहे. 
- सौदागर तांदळे, तहसीलदार, तुळजापूर 

तहसीलदारांनी लवकर प्रश्न निकालात काढण्याबाबत आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही त्यांना सहकार्य केले आहे. जाणीवपूर्वक दिरंगाई झाली, तर पुन्हा आंदोलन करणार आहोत. 
- नवनाथ दुधभाते, पिडीत शेतकरी, धनगरवाडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com