esakal | अन्‌ त्यांच्या झोपडीतील चुली पेटल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

संचारबंदीमुळे हाताला काम नसल्याने अनेक गरजू कुटुंबावर संक्रात आली आहे. संचारबंदीमुळे बाहेर पडायचे नाही तर मग खायचे काय, असा प्रश्न या २८ कुटुंबाला भेडसावत होता.  ..

संचारबंदीमुळे हाताला काम नसल्याने अनेक गरजू कुटुंबावर संक्रात आली आहे. संचारबंदीमुळे बाहेर पडायचे नाही तर मग खायचे काय, असा प्रश्न या २८ कुटुंबाला भेडसावत होता.

अन्‌ त्यांच्या झोपडीतील चुली पेटल्या...

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (जि. उस्मानाबाद) : संचारबंदीत शहर परिसरात मोलमजुरी करून उपजीविका भागविण्यासाठी झोपड्या करून वास्तव्यास असलेल्या २८ कुटुंबाना पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वितरीत केले. त्यांच्या या उपक्रमामुळे अशा बिकट परिस्थितीत झोपडीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबाच्या झोपडीतील चुली पेटल्या. 

संचारबंदीमुळे बाहेर पडत येत नाही, कुणाची ओळख सांगावी अन्‌ अन्नधान्य कसे आणावे असा मोठा प्रश्न अशा कुटुंबापुढे उभा ठाकलेला असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मदतीचा हात दिला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य स्वत: परिसर गाठून आणून दिले. त्यानंतर त्यांच्या झोपडीतील चुली पेटल्या. हा प्रकार शहर परिसरातील २८ कुटुंबाच्या बाबतीत घडला आहे.

हेही वाचा - ‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट

परिसरात विहिरीच्या कामाचा ठेका घेऊन काम करणारे, रस्त्याच्या कामासाठी दगड फोडणारे मजूर आदी कामे करून उपजीविका भागवणारे अनेक कुटुंबे झोपड्या करून वास्तव्यास आहेत. संचारबंदीमुळे हाताला काम नसल्याने या कुटुंबावर संक्रात आली आहे. संचारबंदीमुळे बाहेर पडायचे नाही तर मग खायचे काय, असा प्रश्न या २८ कुटुंबाला भेडसावत होता. हातावरच पोट असणाऱ्या या घटकांची जबाबदारी राज्य शासनाची आहे. संचारबंदीमुळे या घटकाची मजुरी बंद झाली आहे. त्यामुळे एकवेळचे अन्न मिळण्यास या कुटुंबासाठी कठीण झाले आहे.

भारतीय जनता पक्षाचे अजित पिंगळे, बाजार समितीचे सभापती रामहरी शिंदे, अमजत मुल्ला, इम्रान मुल्ला, शहराध्यक्ष संदीप बावीकर, माणिक बोदर, शीतल चोंदे, आण्णा कवडे, शिवा शिंगणापुरे, गोपाळ चोंदे यांनी परिसरात असे कुटुंब किती आहेत, याची माहिती घेतली. तसेच सामाजिक भान बाळगत कोरोना विषाणूपासून बचावासाठी घरातच राहण्याचे आवाहन करीत पंधरा दिवस पुरेल इतके अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप केले.