सव्वा तीन एकर क्षेत्रावरील भोपळा जागेवरच सडतोय

उमरगा : शेतातच सडून जात असलेले भोपळे.
उमरगा : शेतातच सडून जात असलेले भोपळे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देऊन आधुनिक फळलागवडीचा प्रयोग यशस्वी होत असताना ऐन काढणीच्या काळात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली अन्‌ सव्वातीन एकर क्षेत्रावरील भोपळ्याचे वेलीला झालेले ओझे काढण्यासाठी शेतकऱ्यांना पदरमोड करण्याची वेळ आली आहे. साधारणतः साठ टनांच्या उत्पन्नातून कमीत कमी पाच लाख रुपये मिळाले असते; मात्र उठावच नसल्याने नुकसान सहन करीत उमरग्यातील शेतकरी दिलीप इंगळे यांनी भोपळे बंधाऱ्यावर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने गावासह जिल्हा, परजिल्हा व राज्य सीमा बंद झाल्या. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेसह बाजारपेठा ठप्प झाल्या. यात सर्वाधिक आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

उमरग्यातील शेतकरी दिलीप इंगळे यांनी भोपळ्याची अडीच महिन्यांपूर्वी सव्वातीन एकरांत लागवड केली. लॉकडाऊनच्या चार दिवसांपूर्वी साधारणतः दोन ते पाच किलो वजनाचे भोपळे काढणीला आले होते.

काढणीला सुरवात झाली आणि देशात सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाजारपेठा बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा घाईगडबडीत दहा टनांचा लोड मुंबईला पाठविण्यात आला; मात्र दर प्रतिकिलो दीड रुपया मिळाल्याने केवळ पंधरा हजार रुपये मिळाले, त्यात १३ हजार रुपये ट्रकचे भाडे आणि दोन हजार रुपये काढणीचा खर्च झाला. त्यामुळे एक रुपयाचाही नफा मिळाला नाही. शेतात आणखी जवळपास पन्नास टन माल आहे; मात्र तो खराब होत आहे. 

पाच लाखांचे झाले नुकसान 
भोपळ्याला प्रतिटन किमान आठ ते दहा हजार रुपये दर मिळाला असता; मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठेतील संबंधितांकडून काहीच हालचाली होत नाहीत. मुंबई व वाशीच्या बाजारपेठ भोपळ्याला चांगला दर मिळतो. भोपळ्याचा वापर सांबर व भाजीसाठीही केला जातो; परंतु सध्या हॉटेल्स व्यवसाय पूर्णतः कोलमडल्याने भोपळ्याची मागणीच होत नाही. त्यामुळे जवळपास पाच लाखांचा आर्थिक फटका या शेतकऱ्याला बसला आहे. 

आधुनिक शेतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न भोपळा फळशेतीच्या माध्यमातून केला; मात्र लॉकडाऊनमुळे जागेवर माल खराब होत आहे. लॉकडाऊनची मुदत आणखी वाढण्याची स्थिती दिसत असल्याने मजूर लावून भोपळे काढण्याचे काम सुरू केले आहे. जवळपास पाच लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 
- दिलीप इंगळे, शेतकरी, उमरगा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com