‘तुमचे आशीर्वाद राहू द्या’ म्हणत कृषिमंत्री पडले शेतकऱ्याच्या पाया

तानाजी जाधवर
Monday, 22 June 2020

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांनी विविध ठिकाणी भेटी देत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

उस्मानाबाद : ‘शेतकऱ्यांमुळे आम्ही आहोत. तुम्ही आमच्या पाया पडू नका. आम्हीच तुमच्या पाया पडतो. तुमचे आशीर्वाद राहू द्या,’ असा भावनिक संवाद साधून कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांची मने जिंकल्याचे दिसून आले. सोमवारी (ता. २२) जिल्हा दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री भुसे यांनी विविध ठिकाणी भेटी देत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

कळंब तालुक्यातील बांगरवाडी येथील चांगदेव बांगर यांच्या, तसेच येडशी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात पाहणी करीत बियाणांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारीची दखल घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आढावा घेत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत सुधारणा करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

सध्या असलेले बियाणे, खतपुरवठा व प्रत्यक्षात विक्री करताना शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींचा आढावा घेण्याची गरज असून, अधिकाऱ्यांनी या काळात कोणत्याही तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे आदेशही त्यांनी दिले.

येरमाळा येथील बांगरवाडीच्या एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांनी अत्यंत अडचणीच्या काळामध्ये पेरणी केलेली आहे. अशा काळामध्ये बियाणे उगवले नसल्याने त्यांचे नुकसान झालेले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी हा दौरा असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारण्याअगोदरच मंत्रिमहोदयांनी सुरवातीलाच शेतकऱ्यांना आधार दिल्याने संतप्त असलेला शेतकरीही शांत झाला.

लातूर जिल्हा बँकेतर्फे ५६३ कोटीचे पिक कर्ज वाटप, शेतकऱ्यांना मिळाला लाभ

शेतकऱ्यांनी काळजी करू नये. हे सरकार तुमचे आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नसून, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात आले. 

शेतकरी घटक हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर असल्याने मी याबाबतीत अत्यंत भावनिक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे माझे काम आहे. त्याची संधी मला मिळाली असून, मी तेच काम करीत आहे. आजवर काय झाले यापेक्षा पुढे काय करता येईल, एवढाच मी विचार करीत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

माझ्याविरोधात टीका करणाऱ्यांचे मी स्वागत करतो. लोकशाही असल्याने त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य त्यांना असल्याचे सांगत विरोधकांनाही उत्तर देण्याचे टाळल्याचे दिसून आले. कृषिमंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद येथे स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच दुसऱ्या दिवशीही त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना आधार दिल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Osmanabad