esakal | कुतूहल जागविणाऱ्या पाणचक्‍कीला अतिक्रमणांचा विळखा
sakal

बोलून बातमी शोधा

ऐतिहासिक पानचक्‍कीचे पाणी यंदा पावसाळ्यातच बंद झाले आहे. पानचक्‍कीच्या परिसरात थाटलेल्या दुकानांमुळे या वास्तूचे ऐतिहासिक सौंदर्यच नष्ट झाले आहे.

ऐतिहासिक पानचक्‍कीचे पाणी यंदा पावसाळ्यातच बंद झाले आहे. पानचक्‍कीच्या परिसरात थाटलेल्या दुकानांमुळे या वास्तूचे ऐतिहासिक सौंदर्यच नष्ट झाले आहे.

कुतूहल जागविणाऱ्या पाणचक्‍कीला अतिक्रमणांचा विळखा

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद - खुलताबाद आणि औरंगाबादची भूमी सुफी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. देश-विदेशांतून येणाऱ्या यात्रेकरूंच्या भोजनाची सोय रशियामधील गझनवाद येथून इथे आलेले हजरत बाबा शाह मुसाफिर यांनी पाणचक्‍की येथे केली. या ठिकाणी सराय (धर्मशाळा), मशीद, पाण्यासाठी भलेमोठे हौद बांधण्यात आलेले आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या यात्रेकरूंच्या जेवणासाठी लागणारे पीठ दळणारी यंत्रणा त्यावेळी उपलब्ध नव्हती. या गरजेतून पाणचक्‍कीत पाण्यावरून पिठाची गिरणी चालवली जायची आणि त्या 'चक्‍की'त धान्य दळून त्याचे पीठ केले जायचे. पाण्यावर चालणारी चक्‍की म्हणजे पाणचक्‍की.  
 
औरंगाबाद शहराच्या उत्तरेकडे सुमारे सहा किलोमीटरवर असलेल्या जटवाड्याच्या डोंगरातून जमिनीत जवळपास 30 फुटांपर्यंत खोदकाम करून पाणचक्‍कीपर्यंत नहर-ए-पाणचक्‍की तयार करण्यात आली. नहरीत चारही बाजूंनी येणारे झरे एकत्रित करून त्यांचे पाणी भूमिगत नहरीच्या माध्यमातून पाणचक्‍कीपर्यंत आणले आणि हे पाणी 20 फूट उंचीच्या भिंतीवरून चक्‍कीच्या पंख्यावर सोडण्यात आले होते. पंख्याच्या लोखंडी पात्यावर जोराने पाणी पडल्यानंतर तो पंखा फिरायचा आणि त्याच्या वरच्या भागात पंख्यावर बसविण्यात आलेले जाते फिरायचे. याच जात्यातून धान्याचे पीठ व्हायचे, जे यात्रेकरूंच्या जेवणाची व्यवस्था करीत असे. आज चक्‍कीतून धान्य दळले जात नसले तरी तो लोखंडी पंखा आणि दगडी जाते आजही पाण्याच्या फोर्सनुसार फिरत आहे. ही ऐतिहासिक पाणचक्‍की शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र व कुतूहलाचा विषय बनली आहे. या परिसरात पाणचक्‍कीबरोबरच हजरत बाबा शाह मुसाफिर, बाबा पलंगपोश यांच्या कबरी, ऐतिहासिक मशीद, सराय आणि इतिहासकालीन वस्तू पाहायला मिळतात. 

नहरीच्या दुरुस्तीची गरज 
ज्या नहरींद्वारे या पाणचक्‍कीत त्यावेळी बाराही महिने पाणी आणले जायचे, त्या नहरींची आज दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी नहरी फुटल्या असून त्यात दगड, माती, कचरा साचल्याने पूर्वीच्या गतीने नहरीतून पाणी येत नाही. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच पाणचक्कीत येणारे पाणी बंद होते. त्यामुळे शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर टाकणाऱ्या पाणचक्‍कीच्या नहरींची दुरुस्ती करणे अतिशय महत्त्वाचे आहे. पाणचक्‍कीचे पाणी पडणाऱ्या हौदात सोडण्यात आलेल्या माशांसाठी पर्यटक खाद्य टाकतात. त्यातच या हौदाची नियमित सफाई केली जात नसल्याने पाणी प्रदूषित होऊन त्याची दुर्गंधी पसरते. यामुळे या हौदात मासे सोडण्याला प्रतिबंध केला गेला पाहिजे आणि हौदाची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. 

अतिक्रमणांचा विळखा सोडवा 
ऐतिहासिक पाणचक्कीच्या वास्तूला अतिक्रमणांनी विळखा घातला आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पाणचक्कीचा विस्तीर्ण परिसर, हौद आणि झाडांचे सौंदर्य नजरेस पडायला हवे. मात्र, अतिक्रमण, दुकानांमुळे या मध्ययुगीन वास्तूचे सौंदर्यच हरवले आहे. दर्शनी भागातच दुकाने थाटून वक्‍फ बोर्डातर्फे उभारण्यात आलेल्या मनमानी अतिक्रमणांनी पाणचक्कीला विद्रूप केले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या वास्तूत राज्य वक्‍फ बोर्डाला कार्यालय थाटण्याची परवानगी देतानाच या जागेचे हस्तांतरण वक्‍फकडे करण्यात आले होते. हे कार्यालय पाणचक्कीत असेपर्यंत या ठिकाणच्या डागडुजीची जबाबदारी वक्‍फ बोर्डाकडे देण्यात आली आहे. पाणचक्की हाती आल्यापासून तिकिटांच्या रूपात येथून महसूल गोळा करणाऱ्या वक्‍फ बोर्डाने पाणचक्कीचे मूळ रूपच गायब करून टाकले आहे. येथील बगीचे आणि सौंदर्याची स्तुती करणाऱ्यांमध्ये दिग्गजांचा समावेश राहिला आहे. यात ब्रिटिश राजवटीच्या व्हाईसरॉयपासून संगीतकार नौशाद यांच्यापर्यंत अनेकांची नावे घेता येतील. पण त्यांनी पाहिलेल्या पाणचक्कीचे रूप आता तसे राहिलेले नाही. 

loading image
go to top