esakal | PMAY बाबा गेला अन् दशम्याही गेल्या, नव्यासाठी पाडले जुने घर
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्याने जुने घर पाडले, आता म्हणे नियमात बसत  नाही 

PMAY बाबा गेला अन् दशम्याही गेल्या, नव्यासाठी पाडले जुने घर

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेचा घोळ चार वर्षांनंतरही सुरूच आहे. काही लाभार्थ्यांची निवड करून महापालिकेने कामही सुरू केले. जुने घर पाडल्यानंतर नव्या घराचे बेसमेंट झाले. त्यानंतर प्रशासनाला या जागा हरितपट्ट्यात असल्याचा साक्षात्कार झाला. जुने घर गेले व नवे अडचणीत सापडल्यामुळे लाभार्थी आता संतप्त झाले आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील 80 हजार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील 731 अर्जदारांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्या होता. शासनाने मंजुरी दिल्यानंतर आर्किटेक्‍टमार्फत (वास्तुविशारद) बांधकाम नकाशासह बांधकाम परवानगीसाठी फायली पाठवल्या. मात्र, आता मिसारवाडी, नारेगाव, जाधववाडी, हर्सूल, सातारा, देवळाई, पडेगाव, भावसिंगपुरा यासह शहर परिसरातील 118 लाभार्थींच्या जागा हरितपट्ट्यात असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना बांधकाम परवानगी नाकारत योजनेचा लाभ देण्यासही नकार दिला. दरम्यानच्या काळात काहींनी जुने कच्चे बांधकाम पाडून बेसमेंट सुरू केले होते. आता योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे महापालिकेने कळविल्याने हक्काचा
निवाराही गेला आणि नवीन घरही होऊ शकत नाही, अशा विवंचनेत लाभार्थी सापडले आहेत. 

आमच्या वसाहतीतील 11 जणांची निवड झाली आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही जुनी घरे पाडून नवीन घरासाठी बेसमेंट तयार केले. त्यानंतर महापालिकेने घराच्या कामाचे छायाचित्रही काढले. आता ही जागा "ग्रीन झोन'मध्ये असल्याचे सांगून आम्हाला अनुदान मिळणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने आम्हास जुन्या घराची नुकसान
भरपाई द्यावी.  
- शेख इसा शेख चॉंद, लाभार्थी, मिसारवाडी. 

घरकुल योजनेसाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. महापालिकेने निवड झाल्याचे सांगितल्यामुळे आता चांगले घर आपल्याला बांधता येईल, याच्या आनंदात होतो. मात्र, आता जमीन ग्रीन झोनमध्ये कशी आली? आता दुसऱ्या योजनेतून तुम्हास अनुदान मिळवून देऊ, असे योजनेचे अधिकारी संतोष निपाणीकर सांगत आहेत.'' 
- नसीमखॉं, लाभार्थी, काबरानगर. 

loading image
go to top