वर्तमानपत्रे आहेत समाजमनाचा आरसा

प्रमोद चौधरी
रविवार, 5 एप्रिल 2020

कोरोना विषाणुचा संसर्ग वर्तमानपत्राच्या माध्यमातून पसरविला जातो, असा गैरसमज काहींनी समाजामध्ये पसरविला आहे. परंतु, कोरोना आणि वर्तमानपत्र यांचा कुठलाही संबंध नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहिर केले आहे. 

नांदेड : बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले व त्याचे नाव ही अगदी योग्यच होते. दर्पण म्हणजे आरसा. वर्तमानपत्रे हे समाज जीवनाचा आरसा आहेत. समाजात सामाजिक, आर्थिक, शासकीय, राजकिय, शैक्षणिक अशा विविध पातळीवर जे घडते त्याचे पडसाद वृत्तपत्रात उमटतात. त्यामुळे प्रत्येकाने वर्तमानपत्र हे वाचलेच पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

वृत्तपत्राचे काम आजही दीप स्तंभासारखेच
व्यावसायिकतेच्या ऊद्देशाने पत्रकारिता सुरु झालेली नव्हती तर पाश्चीमात्य शिक्षणातुन आधुनिकतेची झालेली ओळख समाजाला करुन देण्याचे ध्येय त्यामागे होते.  म्हणुनच वृत्तपत्राचे हे माध्यम समाजासाठी दिशादर्शक ठरते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गतीने इतरही प्रसार माध्यमे आलीत. मात्र, वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवून आजही दीपस्तंभासारखे दिमाखाने उभे आहे. आज शहरच नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत वृत्तपत्राचे जाळे पसरले आहे . शाळा-महाविद्यालयांतुन युवक युवतींचा वाचक वर्ग तयार झाला आहे. 

हेही वाचा - भाग दोन : ‘अशी’ घ्यावी शेतमालाची व वैयक्तिक काळाजी

मनौधैर्य वाढविण्याचे काम वृत्तपत्र करते
खरंतर वृत्तपत्रे ही समाज व मानव यांना जोडणारा सकारात्मक दुवा आहे. प्रत्येकांच्या गरजा पुरवण्याचे काम वृत्तपत्रे करतात.  मग ती नोकरीसाठी रिकाम्या पदाच्या जागा असो की जागा खरेदी-विक्री असो, नाटक सिनेमा, साहित्यसंबधातली माहिती, शासकीय योजना आदी सर्व माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्याचे सक्षम माध्यम आहे. वृत्तपत्रे नेहमीच ‘समुपदेशकाची’ भुमिका पार पाडतात. कारण वृत्तपत्राला ‘समाजमन’ कळते. शिवाय मनोधैर्य वाढवण्याचे, आत्मविश्वास जागृत करण्याचे काम वृत्तपत्र करत असतात.  

आयुष्य सुखकर करण्याची महत्त्वाची भूमिका
वृत्तपत्रे ही सर्व सामान्यांचे वैयक्तीक आयुष्य सुखकर करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावतात. नवनवीन माहिती, नवीन शोध, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडी,  स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनपर माहिती ही वर्तमानपत्रातूनच मिळते. खरंतर वृत्तपत्रे ही समाज व मानव यांना जोडणारा सकारात्मक दुवा आहे. प्रत्येकांच्या गरजा पुरवण्याचे काम वृत्तपत्रे करत असतात. भिन्नभिन्न वाचक गटासाठी खास पुरवण्या असतात.  स्त्रीयांसाठी, युवावर्गासाठी, बालकांसाठी, वृध्दांसाठी भरभरुन माहिती या पुरवण्यांच्या माध्यमातून दिली जात असल्याने समाज आणि वर्तमानपत्र यांच एक अतुट नातं बनलं आहे. 

येथे क्लिक करा - कोवीड-19 : वंचितकडून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण

दिनदुबळ्यांचा कैवारी
वैश्विक माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्यचे काम वर्तमानपत्रांतून होते. त्यामुळे समाज प्रगतीत, देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. समस्त जनांचा, गोरगरिबांचा, महिलावर्गांचा, दिनदुबळ्यांचा कैवारी म्हणून वर्तमानपत्राची जबाबदारी आहे. आणि ती आज निःस्वार्थपणे पार पाडली जात आहे.  
- डॉ. ऊज्ज्वला सदावर्ते (प्राचार्य, हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newspapers are the Mirror of Society Nanded News