Maratha Reservation : गुन्हे दाखल झालेले नऊ जणांची शरणागती

शिवाजी देशमुख
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

आंदोलनाच्‍या वेळी गुन्‍हे दाखल झालेल्‍या खोट्या गुन्‍ह्‍यात स्‍वतःहून अटक करून घेण्याची भूमिका त्‍यांनी बोलून दाखवली. त्‍यानंतर मराठा समाजाचे कार्यकर्ते चौकात दाखल झाले. 

सेनगाव : मराठा आरक्षण आंदोलनात गुन्‍हे दाखल झालेल्‍या नऊ जणांनी
सोमवारी (ता. 4) स्‍वतःहून अटक करून घेतली. यावेळी नागरिकांनी
वाजतगाजत मिरवणूक काढली. सेनगाव तालुक्‍यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले होते. यामध्ये तालुक्‍यातील ठिकठिकाणी रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले. 

तसेच रस्‍त्‍यावर झाडे तोडून वाहतूक व्यवस्‍था ठप्‍प करण्यात आली होती. तर
सेनगाव येथे काही जणांनी पंचायत समितीचा गोदाम पेटवून दिला तर एका
कंत्राटदाराची जीपही जाळून टाकली. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात दहा ते अकरा जणांवर गुन्‍हे दाखल झाले होते.

दरम्‍यान, मराठा समाजाच्‍या शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले
खोटे गुन्‍हे मागे घ्यावेत अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली होती. या
प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिले होते. मात्र त्‍यानंतरही सेनगाव पोलिसांनी जाळपोळ
प्रकरणात आरोप असलेल्‍या आंदोलकांची शोधमोहिम सुरु केली होती. 

दरम्‍यान, सोमवारी (ता. 4) शिवसेना उपजिल्‍हाप्रमुख संदेश देशमुख, युवा सेना उपजिल्‍हा प्रमुख प्रवीण महाजन, तालुकाप्रमुख जगदीश गाढवे, निखील
देशमुख, हेमंत संघई, अनिल गिते, अमोल तिडके, दत्तराव देशमुख, पंढरीनाथ गव्‍हाणे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले. आंदोलनाच्‍या वेळी गुन्‍हे दाखल झालेल्‍या खोट्या गुन्‍ह्‍यात स्‍वतःहून अटक करून घेण्याची भूमिका त्‍यांनी बोलून दाखवली. त्‍यानंतर मराठा समाजाचे कार्यकर्ते चौकात दाखल झाले. 

यावेळी डॉ. अजय मुंदडा, आप्‍पासाहेब देशमुख, प्रकाशराव देशमुख, संतोष
देवकर, विलास खाडे, नारायण झाडे, देविदास वाघ, पिंटू गुजर, संजय
चिलगर, भारत लोखंडे यांच्‍यासह नागरिकांनी मिरवणूक काढून वरील नऊ
जणांना पोलिस ठाण्यात आले. त्‍यानंतर तिथे सत्‍कारही केला. त्‍यानंतर त्‍यांनी स्‍वतःहून अटक करून घेतली. त्‍यानंतर पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, उपनिरीक्षक बाबूराव जाधव, जमादार अनिल भारती यांनी त्‍यांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.

सेनगाव बंद करून निषेध पंचायत समिती गोदाम जळीत प्रकरणात खोटे गुन्‍हे दाखल करून अटकेसाठी धावपळ करणाऱ्या पोलिस प्रशासनाचा नागरिकांनी निषेध केला. यावेळी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली होती. दुपारनंतर बाजारातील व्यवहार सुरु झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine of the accused in Maratha Reservation agitation were surrendered