नांदेडहून गेलेल्या पंजाबच्या नऊ भाविकांना कोरोनाची लागण

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 29 April 2020

तरणतारण जिल्ह्यातील नऊ यात्रेकरूंना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नांदेड : देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर नांदेडमध्ये अडकून पडलेल्या पंजाबमधील यात्रेकरूंना वेगवेगळ्या ट्रॅव्हल्सद्वारे पंजाबमध्ये सोडण्यात आले होते. त्यापैकी आठ दिवसापूर्वी पंजाबमध्ये गेलेल्या तरणतारण जिल्ह्यातील नऊ यात्रेकरूंना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या वृत्ताला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला आहे. 

पंजाबमधून चार हजारहून भाविक येथील सचखंड गुरूद्वाराचे व हल्ला-मोहल्ला या कार्यक्रमासाठी दर्शनासाठी आले होते. ते पंजबाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे देशभर लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे पंजाबमधील चार हजारहून अधिक यात्रेकरू नांदेडमध्ये अडकून पडले होते. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पुढाकारातून अखेर या यात्रेकरूंच्या पंजाबला परत जाण्याचा हालचाली झाल्या. पहिल्या टप्प्यात ५०० च्या आसपास यात्रेकरू नांदेड प्रशासनाने लक्झरी बसद्वारे त्यांची रवानगी केली. त्यानंतर दुसरा टप्यातील जवळपास साडेतीन हजार भाविकांना घेऊन जाण्यासाठी पंजाब सरकारने ७९ बस नांदेडला पाठविल्या होत्या. त्या बसद्वारे पंजामधील सर्व भाविक रवाना झाले.

हेही वाचाVideo : नांदेडच्या विद्याश्रीने घेतली लहान वयातच भरारी, कशी? ते वाचाच
 
पळून गेलेल्या ९० यात्रेंकरुपैकी नऊ जण बाधीत
 
मात्र यापूर्वीच ९० भाविक पळाले होते. आपली नांदेडमधून सुटका होत नसल्याचे पाहून त्यांनी मागच्या ता. १९ एप्रील रोजी रात्री सहा चारचाकी वाहनाद्वारे ९० भाविक प्रत्येकी ७० हजार रुपये भाडे देऊन पळून गेले होते. त्यांच्यावर वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे सर्व भाविक रेड झोनमध्ये असलेल्या मध्यप्रदेशातील इंदौर येथे अडकले होते. तिथेही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हे भाविक तेथून पुढे आपल्या जिल्‍यात गेल्यानंतर त्यापैकी नऊ जणांना कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे उघडकीस आले. ही माहिती नांदेड पोलिसांना व प्रशासनाला समजताच धाबे दणाणले. 

पहिल्या व दुसऱ्या टप्यातील भाविक आज पोहचणार
   
त्यानुसार नांदेड येथून परतलेल्या यात्रेकरूपैकी नऊ जणांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान मंगळवारी (ता. २८) रात्री उशिरापर्यंत पंजाबकडे रवाना झालेल्या अडीच हजार यात्रेकरूंचा प्रवास सुरू झाला असून पंजाब सरकारने राज्याच्या सीमेवरच किंवा ते पोहोचतील त्या गावाला वैद्यकीय पथक पाठवले जाणार आहे. या सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या संदर्भात ही चाचणी होणार असून याबद्दल पंजाब सरकारने सर्वांना सतर्क केले आहे. पंजाब पोलीस सर्व उपविभागीय अधिकारी तसेच आरोग्यव्यवस्था या सर्वांची टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine devotees from Punjab who passed through Nanded contracted corona