Video : नांदेडच्या विद्याश्रीने घेतली लहान वयातच भरारी, कशी? ते वाचाच

प्रमोद चौधरी
Wednesday, 29 April 2020

नृत्य हे अभिव्यक्तीचे सर्वोत्तम माध्यम आहे. मात्र, ही लोकनृत्य कला संस्कृती माहिती करून घेतली पाहिजे. महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोकनृत्य केले जाते. परंतु, या नृत्यांपैकी लावणी नृत्य सर्वात प्रसिद्ध लोकनृत्य आहे. मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमधील बरीच गाणी लावण्यांवर चित्रीत करण्यात आलेली आहेत.

नांदेड : लावणी ही मधुर, लाकूड, नृत्य, गाणे आणि परंपरा यांचे कर्णमधुर मिश्रण आहे. लावणी लोकनृत्याचा विषय समाज, धर्म, राजकारण आणि प्रणय अशा असंख्य विषयांवर केंद्रित आहे.  लावणी हा महाराष्ट्रातील लोकनाट्य-शैलीतील देखाव्याचा अविभाज्य असून, आज ती महाराष्ट्राची सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध लोकनृत्य शैली म्हणून ओळखली जाते. लावणी नृत्याची थीम कोठूनही घेतली जाऊ शकते, परंतु ही शैली शौर्य, प्रेम, भक्ती आणि दुःख या भावना प्रदर्शित करण्यासाठी योग्य आहे.  

प्रत्येकामध्ये कला ही असतेच. लहान मुलांमध्ये ती जास्त असते. त्यामुळे त्यांच्यातील कला ओळखून त्याला आकार दिल्यास निश्चितच यश मिळते, हे विद्याश्रीने दाखवून दिले आहे. विद्याश्रीलाही लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. तिच्या आई-वडिलांनी ती ओळखली आणि विद्याश्रीला लावणी नृत्य कला प्रकारात लहान वयातच भरारी घेणे शक्य झाले. वयाच्या चौथ्या वर्षापासून विद्याश्रीने पुणे येथील किरणकुमार कोरे यांच्याकडे नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षापासून विद्याश्री स्वतंत्र कार्यक्रम करू लागली. बघता बघता तब्बल १५५ कार्यक्रम झालेत. १७ राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त केले आहेत. 

लावणीचा इतिहास
लावणी या शब्दाचा प्रारंभ लावण्य शब्दापासून झाला. ज्याचा अर्थ सौंदर्य आहे. या शास्त्रीय लोकनृत्याने मोठी ओळख निर्माण केली आहे. लावणीच्या उत्पत्तीची नेमकी तारीख अद्याप अस्पष्ट असली तरीही, असे म्हटले जाते की दीर्घकाळ चाललेल्या या नृत्य प्रकारचा उगम मनोरंजनाचा एक वेगळा प्रकार आणि थकलेल्या सैनिकास प्रोत्साहन देण्यासाठी देखील झाला. एकेकाळी महाराष्ट्र युद्धग्रस्त राज्य होते आणि १८ व्या आणि १९ व्या शतकाच्या काळात थकलेल्या सैनिकांसाठी लावणी नृत्य हे करमणूक आणि मनोबल वाढविण्यासाठी सादर केला जात होता. पेशव्यांच्या कारकिर्दीत या नृत्याची लोकप्रियता वाढली.

हेही वाचा -  ‘बंदी’तही शोधली शेतकऱ्याने संधी

विद्याश्रीने अशी घेतली भरारी
विद्याश्री शिवाजी येमचे ही नांदेड शहरातील टायनी एंजल्स स्कूलमध्ये इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. लहानपणापासून तिला नॄत्याची आवड होती. त्यामुळे आई-वडिलांनीही विद्याश्रीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. आज एवढ्या लहान वयामध्ये विद्याश्रीने अनेक पुरस्कार पटकाविलेले असून, १५५ स्टेज शो सादर केलेले आहेत. विशेष म्हणजे या स्टेज शोमधून मिळालेले ९७ हजार रुपयांचे मानधन, बक्षिस हे अनाथ, गतीमंद तसेच वृद्धाश्रमाला मदत करून एवढ्या लहान वयात सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

येथे क्लिक करा -  कलावंतांना सातासमुद्रापार राहूनही केली मदत; कुठे ते वाचा

मराठी सिनेमातही झळकणार विद्याश्री
लावणी नृत्य कला प्रकारात विद्याश्रीने चार आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकाविलेले असून, कलारत्न, भीमाची वाघीण, नृत्य सरस्वती, स्टार महाराष्ट्र, महाराष्ट्र अचिव्हर अवार्ड २०२०, लावणी रत्न, इंडियन आयकॉन (चाइल्ड) अवॉर्ड, आदर्श भारत आदी १७ पुरस्कार प्राप्त केले आहे. शिवाय ध्येय, भूक, आईबाबा, निशब्ध, धोकेबाज या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले असून लवकरच मराठी चित्रपटामध्येही विद्याश्री झळकणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidyashree from Nanded took Bharari at an Early Age Nanded News