लातूर : जनावरांच्या आजाराचे निदान सोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Animal

लातूर : जनावरांच्या आजाराचे निदान सोपे

लातूर - जनावरांना होणाऱ्या विविध आजारांचे निदान करण्यासाठी त्यांच्या रक्त तपासणीची नितांत आवश्यकता असते. जिल्ह्यात केवळ सात ठिकाणच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात रक्त तपासणीची सुविधा असल्याने पशुपालकांची अडचण झाली. जनावरांवरील उपचारासाठी मर्यादा येऊ लागल्या. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात नऊ ठिकाणी रक्त तपासणी सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने चाळीस लाखाचा निधी दिला असून लवकरच या लॅब कार्यान्वयित होणार आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले यांनी ही माहिती दिली.

काळानुरूप जनावरांना नवीन आजार उदभवत आहे. त्यांचे निदान करून उपचारासाठी जनावरांच्या रक्ताची तपासणी करण्याची गरज आहे. विविध आजारांच्या निदानासाठी जनावरांच्याही रक्तातील हिमोग्लोबीन, पांढऱ्या व तांबड्या पेशींचे प्रमाण तपासले जाते. जिल्ह्यात राज्य सरकारच्या पशु सर्वचिकित्सालयातच ही रक्त तपासणीची सुविधा आहे. जिल्ह्यात लातूर येथील जिल्हा पशु सर्वचिकित्सालय, उदगीर, औसा, अहमदपूर, निलंगा, लातूर व बाभळगाव (ता. लातूर) येथे तालुका पशु सर्वचिकित्सालयातही सुविधा आहे. मात्र, नव्याने झालेल्या जळकोट, शिरूर अनंतपाळ, देवणी, चाकूर व रेणापूर तालुका ठिकाणी या पाच ठिकाणी तालुका पशु सर्वचिकित्सालयाची निर्मिती झालीच नाही. यामुळे या तालुक्यातील सर्व जनावरांची अडचण होऊ लागली. तसेच सध्याच्या पशु सर्वचिकित्सालयातील रक्त तपासणी सुविधेचा लाभ घेण्यासाठीही अनेक गावांना २५ ते ४० किलोमीटर एवढे अंतर कापून यावे लागत होते. यामुळेच पशुपालकांच्या सोयीसांठी जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातच ही सुविधा करण्याची संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी मांडली. मात्र, त्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांकडे निधीच उपलब्ध नव्हता. पालकमंत्री अमित देशमुख यांनी नाविन्यपू्र्ण योजनेतून या उपक्रमाला निधी देण्याची तयारी दाखवल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने प्रस्ताव दिला. त्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीतून ४० लाख पन्नास हजाराचा निधी मंजूर केला असून तो जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. या निधीतून लवकरच यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात येणार असल्याचे डॉ. पडिले यांनी सांगितले.

या ठिकाणी होणार नव्या लॅब

देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकूर, भोकरंबा (ता. रेणापूर), किनगाव (ता. अहमदपूर), अंधोरी (ता. अहमदपूर), औराद शहाजानी (ता. निलंगा) व मुरूड (ता. लातूर) येथील जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात या नवीन लॅबची उभारणी होणार आहे.

दवाखान्यांच्या उत्पन्नात भर

जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रत्येक जनावरांसाठी एक रूपया तपासणी शुल्क घेण्यात येते. यातून दवाखान्याच्या उत्पन्नात तेवढी भर पडत नाही. आता रक्त तपासणीतील हेमटॉलॉजिकल व बायोकेमिकल अनालायझरच्या सुविधेमुळे पन्नास रूपये शुल्क घेता येईल. यामुळे दवाखान्यांच्या उत्पन्नात भर पडून आणखी सुविधा वाढवणे शक्य होईल, असेही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पडिले यांनी सांगितले.

Web Title: Nine Places Blood Checking Lab For Animal Latur District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top