हिंगोलीत नऊ हजार मजुरांच्या हाताला काम

राजेश दारव्हेकर
Wednesday, 3 June 2020

जिल्हा परिषदेने मजुरांना गावातच कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्‍याप्रमाणे जिल्‍ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींपैकी २७९ ग्रामपंचायतींमध्ये महात्‍मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली आहेत. 

हिंगोली : जिल्‍ह्यातील २७९ ग्रामपंचायतींतर्गत महात्‍मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे सुरू असून या कामावर आठ हजार ९८२ मजूर कामे करीत आहेत. ग्रामपंचायतींमार्फत गावातच ही कामे केली जात असल्याने लॉकडाउनमध्ये मजुरांना आधार मिळाला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्‍ह्यात रोहयोची कामे सुरू करून मजुरांना गावातच कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्‍याप्रमाणे जिल्‍ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींपैकी २७९ ग्रामपंचायतींमध्ये महात्‍मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली आहेत. 

हेही वाचाBreaking : हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दुहेरी चिंता, सकाळी पुन्हा जमिनीतून आवाज 

सेनगाव तालुक्‍यात  एक हजार ६१८ मजूर

सोमवारी (ता. दोन) या कामावर आठ हजार ९८२ मजूर कामावर असल्याचे पाहावयास मिळाले. यामध्ये औंढा तालुक्‍यातील ३५ ग्रामपंचायतींमध्ये ९८०, वसमत तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींतर्गत दोन हजार १२८, हिंगोलीतील ५७ ग्रामपंचायतींपैकी दोन हजार ८९७, कळमनुरीतील ५९ ग्रामपंचायतींतर्गत एक हजार ३५९, सेनगाव तालुक्‍यात ४७ ग्रामपंचायतींमध्ये एक हजार ६१८ मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर आहेत.

 मजुंराना २०२ रुपये दिवसभराची मजुरी

 ग्रामपंचायतींतर्फे गावातच मजुरांच्या हाताला कामे मिळाली आहेत. येथे कामे करताना सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन केले जात आहे. येथे काम करणाऱ्या मजुंराना २०२ रुपये दिवसभराची मजुरी दिली जात आहे. आठवडाभर कामे केल्यावर या मजुरांच्या बँक खात्यावर रक्‍कम जमा केली जात आहे.

हिंगोली तालुक्‍यात सर्वाधिक मजूर

दरम्यान, जिल्‍ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. लॉकडाउन कालावधीत ही कामे बंद झाली होती. तसेच रोहयोची कामेदेखील बंद झाली होती. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच ही कामे सुरू करण्यात आली आहेत. यात हिंगोली तालुक्‍यात सर्वाधिक मजूर कामावर आहेत. सार्वजनिक विहिरींसह पाणीपुरवठा, घरकुल बांधकाम आदी कामे रोजगार हमी योजनेतून केली जात आहेत.

येथे क्लिक कराधोकादायक : ५४३ वर्गखोल्या बनल्या धोकादायक 

कामगार परतले गावी

मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या धास्तीने अनेक व्यवसाय बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांतून कामगार आपापल्या गावी परतले आहेत. खेडेगावांत काम नसल्यामुळे त्या कामगारांवर अनेक संकटांचा सामना करण्याची वेळ आली होती. मात्र, सध्या पावसाळा जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी खरीपपूर्व कामाला सुरवात केली आहे. त्यामुळे मजूरदारांच्या हाताला रोहयोतून काम मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे चित्र दिसत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine Thousand Laborers Work in Hingoli Hingoli News