‘मातृवंदने’ त परभणी राज्यात नवव्या क्रमांकावर !

कैलास चव्हाण
सोमवार, 9 डिसेंबर 2019

जिल्ह्यातील २३ हजार ५२७ मातांना आठ कोटी ६८ लाख ९७ हजार रुपयांचे वाटप; शहरी भागात या योजनेला राबविण्यासाठी संबंधित नगरपालिका, महापालिकेने दुर्लक्ष केल्याने शहरी भागात ही योजना मागे पडली आहे.

परभणी : माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राखून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत परभणी जिल्हा नववा आला असून ग्रामीण भागातील २३ हजार ५२७ मातांना आठ कोटी ६८ लाख ९७ हजार रुपयांची लाभाची रक्कम मिळाली आहे. शहरी भागात या योजनेला राबविण्यासाठी संबंधित नगरपालिका, महापालिकेने दुर्लक्ष केल्याने शहरी भागात ही योजना मागे पडली आहे.

गर्भवती व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा करून जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारणे, त्याच सोबतच प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर महिलांना आपल्या बुडणाऱ्या रोजगाराची चिंता पडू नये यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात एक जानेवारी २०१७ पासून सुरू केली आहे. महाराष्ट्रात या योजनेला राज्य सरकारने ता. २१ नोव्हेंबर २०१७ च्या राज्य मंत्रिमडळ बैठकीत मंजुरी दिल्याने ता. एक जानेवारी २०१८ पासून राज्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. सर्व घटकातील गरोदर आणि स्तनदा मातांसाठी योजना असून शहरी व ग्रामीण भागासाठी आहे.

हेही वाचा... बौद्धिक श्रम करणाऱ्यांसाठी शारीरिक श्रमही तितकेच महत्त्वाचे

ही योजना केवळ पहिल्याच अपत्यासाठी 
 

ही योजना केवळ पहिल्याच अपत्यासाठी व शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या गरोदर महिला व स्तनदा मातांना लागू असून लाभाची पाच हजार रुपये रक्कम तीन टप्प्यांत संबंधित लाभार्थीच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट जमा करण्यात येत आहे. पहिला हप्ता एक हजार रुपये मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर, दुसरा हप्ता दोन हजार रुपये गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आणि तिसरा हप्ता दोन हजार रुपये प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केला जात आहे.

मूल जन्मल्यानंतर दोन वर्षापर्यंत कारता येणार अर्ज
 

या योजनेचा लाभ नोकरदार महिला वगळता अन्य सर्व गरोदर, स्तनदा मातांना घेता येतो. शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांनी याचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. ज्या महिलेने गरोदरपणात योजनेचा लाभ घेतला नाही, अशांना मूल जन्मल्यानंतर दोन वर्षांपर्यंत यासाठी अर्ज करता येतो. गणेश काकडे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक
 

उघडून तर पहा... परभणी शहरातून बारा लाख रुपयाचे चोरीचे तांबे जप्त !

तालुकानिहाय योजनेचा लेखाजोखा

तालुका........... लाभार्थी................... अनुदान
गंगाखेड....... २ हजार ७१९..... १ कोटी २४ लाख ५ हजार
जिंतूर........... ३ हजार ५८७ ......१ कोटी २८ लाख ७४ हजार
मानवत.......... १ हजार ५२६........ ५५ लाख ७६ हजार
पालम............ १ हजार ६१६.......... ५८ लाख ५५ हजार
परभणी........... ३ हजार ५५५.......... १ कोटी ४६ लाख ४४ हजार
पाथरी.............. २ हजार ६३............ ७९ लाख ४९ हजार
पूर्णा................. २ हजार ६८६........... १ कोटी ९ लाख ५३ हजार
सेलू ..................१ हजार ८५७............ ६९ लाख ४१ हजार
सोनपेठ................ १ हजार २७३.............. ४५ लाख ६० हजार
एकूण ग्रामीण............ २० हजार ८८२ ...........७ कोटी ९५ लाख ४३ हजार रुपये

शहरी भाग
परभणी शहर............... १ हजार ८८२............ ५० लाख ५७ हजार
गंगाखेड शहर................ २३२....................  ८ लाख ४१ हजार
जिंतूर शहर.................... १९३..................... ५ लाख ४४ हजार
पाथरी शहर..................... ९४ .......................२ लाख ७३ हजार
पूर्णा शहर...................... १०७ ......................२ लाख ३६ हजार
सेलू शहर....................... १३७ ....................४ लाख ३० हजार
एकूण शहरी................... २ हजार ६४५................ ७३ लाख ५४ हजार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ninth in Parbhani district state in 'this' scheme!