प्रकल्पाला गेला तडा, शेतकऱ्यांच्या स्वप्नांनाही! परंडा तालुक्यातील ‘खंडेश्‍वरी‘ ची गत, सांडवा फोडल्याचे प्रकरण

Khandeshwari Mini Dam`
Khandeshwari Mini Dam`

औरंगाबाद: मराठवाड्यावर यंदा पावसाची कृपादृष्टी आहे. बहुतांश जलप्रकल्प ओसंडत आहेत. या पार्श्वभूमीवर एखादा प्रकल्प पूर्ण भरलेला असताना त्याला मोठा तडा गेला तर? परंडा तालुक्यातील खंडेश्वरी प्रकल्पाबाबत असेच झाले आहे. या प्रकल्पाला तडा गेला, सतर्कता म्हणून प्रशासनाने सांडवा फोडला आणि लाभ क्षेत्रातील सोळा गावांतील शेतकऱ्यांचे बागायतीचे स्वप्न भंगले. 

दुष्काळ कायम पाचवीला पूजलेला मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा. याच जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणून राज्यात ओळख असलेला परंडा तालुका. या तालुक्यातील खंडेश्‍वरवाडी गावचा १.८० दलघमी क्षमतेचा खंडेश्‍वरी मध्यम प्रकल्प यंदा २० सप्टेंबररोजी पूर्ण क्षमतेने भरला. पावसाळ्याच्या सुरवातीलाच दमदार पर्जन्यमान झाल्याने हा प्रकल्प पूर्ण भरेल अशी आशा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील आठ ते दहा गावच्या शेतकऱ्यांना होती.

अखेर तब्बल चार वर्षानंतर प्रकल्प पूर्ण भरल्याने शेतकऱ्यांना उत्साह संचारला. गाव परिसरातील शेतकऱ्यांनी कोणी साडेतीन चार लाख रुपये खर्चून तीन हजार, पाच हजार फुटांवर पाईपलाईन केल्या. कोणी आंध्र प्रदेशातून पिंक पेरुचे रोप आणले, कोणी जळगाव तब्बल ४०० किलोमीटरहून केळीची रोपे आणली. मागील पाच ते सात वर्षापासून या पट्टयात केळी लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. हा खर्च भागविण्यासाठी परिसरातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे काढले आहेत.

प्रकल्पाचा साडेतीन-चार लाख रुपये होणारा खर्च भागविण्यासाठी एकही राष्ट्रीयीकृत बॅंक कर्ज देत नाही ही एक शोकांतिकाच आहे. महत्त्वाचे म्हणजे दुष्काळी भागामुळे खंडेश्‍वरी प्रकल्पाकडे कोणा शासकीय अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही, यंदा प्रकल्प पूर्ण भरला खरा, मात्र प्रकल्पाला तडा गेल्याने प्रशासनाने सांडव्याची भिंत एका रात्रीत फोडली. आता जवळपास सर्वच पाणी प्रकल्पातून कमी झाल्याने प्रकल्पाच्या जीवावर केलेला खर्चही एका रात्रीत वाया गेला असून ‘बागायती शेती करण्याचे स्वप्न भंगले आहेच, पण आता जगावं कसं असा सवाल या भागातील शेतकरी करत आहेत.

भरलेल्या प्रकल्पातून पाणी खाली सोडल्याने खंडेश्‍वरवाडी गावसोबतच तब्बल १६ गावांचे कोटींमध्ये नुकसान झाल्याचे दुःख शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. याशिवाय प्रकल्पाच्या खालच्या गावातल्या ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आलंय त्यांचेही जगण्यासाठी हाल सुरु आहे. ‘पाण्याच्या जीवावर लाखांवर पैसं खर्च करुन केळी, पेरुची रोपं आणली, पण प्रकल्प फोडला, अन पाणी सोडून दिलंय, आता डोळ्यातलं बी पाणी आटून गेलंय, कशाच्या जीवावर बागायती करायचं’ या शब्दात खंडेश्‍वरवाडीतील शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

पाहणी न केल्याने वेळ 
मध्यम प्रकल्प पूर्ण भरला होता, मात्र २८ सप्टेंबरला प्रकल्पाची एक भिंत (भराव) खचला, दीड फूट रुंद आणि जवळपास साडेपाचशे फूट लांब भेग पडली, हा प्रकार गावकऱ्यांच्याच लक्षात आला, आणि प्रशासनास कळविल्यानंतर २९ सप्टेंबरला प्रशासनाने प्रकल्पाचा सांडवा फोडला आणि नळी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु केला होता. यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने वेळोवेळी पाहणी न केल्याने ही वेळ आल्याचा आरोप भारत टिटवे यांनी केला. 

खंडेश्‍वरवाडीत सकाळी ८ वाजताच पोहोचलो. देवराव नलवडे, बापू सवासे, भारत टिटवे खंडू राऊत, लक्ष्मण काळे आदि शेतकरी बोलते झाले. खंडेश्‍वरवाडीतील १५ ते २० शेतकऱ्यांनी सरासरी १५०० ते २००० (प्रति शेतकरी) पेरुची रोपे आंध्र प्रदेशातून (प्रति रोप १४५ रु) आणली होती. तर १५० ते २०० शेतकऱ्यांनी १६ रुपये प्रति केळीचे रोप या दराने दोन हजार ते ७००० रोपे (प्रति शेतकरी) आणली होती. याशिवाय गावातील २५ ते ३० शेतकऱ्यांनी जवळपास (प्रति शेतकरी अडीच लाख ते पाच लाख रुपये खर्चून) नविन पाईपलाईन केल्या होत्या. हा कोटीमध्ये झालेला खर्च आता कसा भागवायचा असा सवाल या गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. 

३ वर्षापूर्वी ४ लाख खर्चून पाईपलाईन केली, मस्चिंग, शिमला मिरचीला खर्च केला, यंदा धरण भरल्याने आशा होती, पण मध्येच सांडवा फोडून पाणी सोडून दिला. हा खर्च कसा भागवायचा हा प्रश्‍न पडलाय. 
-नवनाथ जाधव, शेतकरी, खंडेश्वरवाडी 
 
सांडवा फोडल्याने धोका टळलल्याचं अधिकारी सांगतात, पण पाणी सोडणं थांबवा अशी विनंती केली की, आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही, तुम्ही घेता का? अशी विचारणा करतात. मग शेतकऱ्यांनी कशाकशाची जबाबदारी घ्यायची? 
- देवराव नलवडे, शेतकरी, खंडेश्वरवाडी 

प्रकल्पाला तडा गेल्याचं लक्षात आलं की, सांडवा फोडण्यात आला. ही भेग कशामुळे गेली याची पाहणी नाशिकची तांत्रिक टीम करत आहे. खास कारण अजूनही कळू शकलेलं नाही. ९ ऑक्टोंबरअखेर प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा आहे. 
-गोवर्धन उबाळे, उपकार्यकारी अभियंता, अनाळा शाखा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com