निजामकालीन मानाची परंपरा यंदा खंडीत, बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा

कमलेश जाब्रस
Tuesday, 18 August 2020

निजामकालीन काळापासुन येथील शेटे कुटुंबीयांना बैल पोळ्याला माजलगाव शहरात सर्वांत पहिल्यांदा मिरवणूक काढण्याचा मान असतो. परंतु कोरोनामुळे या वर्षी इतिहासात पहिल्यांदाच ही मानाची असलेली परंपरा खंडीत झाली आहे.

माजलगाव (जि.बीड) : निजामकालीन काळापासुन येथील शेटे कुटुंबीयांना बैल पोळ्याला शहरात सर्वांत पहिल्यांदा मिरवणूक काढण्याचा मान असतो. परंतु कोरोनामुळे या वर्षी इतिहासात पहिल्यांदाच ही मानाची असलेली परंपरा खंडीत झाली आहे. शेतकरी आणि बैलांचे जिव्हाळ्याचं नातं घट्ट करणारा सण म्हणजेच बैलपोळा. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण. हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला सर्वत्र बैलपोळा सण साजरा करण्यात आला. परंतु तो खूप साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

जालन्याच्या कुंडलिका नदीत तरूण गेला वाहून, शोध मोहिम सुरुच

गावोगावी वाजत गाजत काढण्यात येणारी बैलांची मिरवणूक पाहायला मिळाली नाही. गावात सर्वत्र शुकशुकाट होता. शहरातील झेंडा चौक भागातील शेटे कुटुंबीयांकडे मागील पाच पिढ्यांपासुन शहरात सर्वांत आधी मिरवणुक काढण्याचा मान आहे. त्यानंतर शहरातील शेतकरी आपापल्या बैलांची मिरवणूक काढतात. परंतु कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत व दहा दिवस केलेल्या टाळेबंदीमुळे ही परंपरा खंडीत झाली आहे.

 

मागील पाच पिढ्यांपासून मिरवणुकीचा मान आमच्या कुटूंबीयांकडे आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यावर्षी शेतातच बैलपोळा साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. प्रतिकात्मक चिखल मातीचे बैल तयार करून शहरातील हनुमान मंदिराला फेरे मारून परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.
- सोमनाथ शेटे, माजलगाव.

साधेपणाने पुजन करुन बैलपोळा साजरा
किल्लेधारूर (जि.बीड) ः कोरोनामुळे तालुक्यात मंगळवारी (ता.१८) बैलपोळा पुजन करुन साधेपणाने साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणाऱ्या विश्वासू साथीदाराचा सण म्हणून बैलपोळ्याच्या सणास ग्रामीण भागात मोठे महत्त्व आहे. सरकारी आदेशामुळे घरीच पोळा साजरे करण्याचे आवाहन केले होते. बळीराजाच्या आनंदाचा आणि सर्जाराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा, वर्षभर राबराब राबून शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन काळ्या मातीत पिकविण्यासाठी कठोर मेहनत घेतो, अशा बैलाला वर्षातुन एकदा बैलाला गावात सजून धजून फिरवले जाते. आणि बैलपोळा हा सण साजरा केला जातो. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ढोल, ताशा, फटाके, मिरवणूक न काढता अगदी साध्या पद्धतीने आपल्या घरोघरी पोळा साजरा केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nizam Period Bail Pola Festival Not Celebrate Majalgaon News