कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह रुग्णवाहिकेत दहा तास पडून

कमलेश जाब्रस
Sunday, 20 September 2020

माजलगाव शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

माजलगाव (जि.बीड) : माजलगाव शहरातील एका कोविड रूग्णालयामध्ये रात्री दहा वाजता कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचे निधन झाले. सदरील रूग्णालयाने प्रशासनाच्या सर्व विभागास याची माहिती कळविली. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने हा मृतदेह अंत्यसंस्काराशिवाय तब्बल दहा तास एकाच जागेवर राहिल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) रात्री घडली आहे.

कोरोना रूग्णाच्या संख्येमध्ये शहर व तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी देखील नागरिकांना मात्र याबद्दल कसल्याही प्रकारची भिती राहिलेली नाही. विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण तर वाढतच चालले आहे तर कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढतेच आहे.

‘नको आवाज देऊ तू, आता कोमात आहे मी’

शुक्रवारी शहरातील एका कोरोना हॉस्पिटलमध्ये रात्री दहा वाजता कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचे निधन झाले. याबाबत येथील डॉक्टर व नातेवाईकांनी आरोग्य विभाग, महसुल विभाग व नगरपालिकेस याबाबत माहिती दिली. मात्र तब्बल दहा तास हा मृतदेह रूग्णवाहिकेत पडुन राहिला. तात्काळ अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पालिकेकडे असतांना मात्र या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

 

कर्तव्यात कसुर करणा-या नगर पालिकेच्या संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यास या प्रकरणाचा जाब विचारण्यात येणार आहे.
- डॉ. प्रतिभा गोरे, तहसिलदार

शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस असल्यामुळे विलंब झाला आहे. सकाळी या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- विशाल भोसले, प्रभारी मुख्याधिकारी, माजलगाव

 

 

संपादन - गणेश पिटेकर

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Creamation Of Corona Positive Patient Body After Ten Hours