
अंबुलगा मेन (ता.निलंगा) येथे स्मशानभूमीसाठी संपादित जागा नसल्यामुळे गावातील मृत झालेल्या व्यक्तीला अंत्यविधी करण्यास अडथळा होत असून असाच प्रकार गुरूवारी (ता.तीन) घडला.
निलंगा (जि.लातूर) : अंबुलगा मेन (ता.निलंगा) येथे स्मशानभूमीसाठी संपादित जागा नसल्यामुळे गावातील मृत झालेल्या व्यक्तीला अंत्यविधी करण्यास अडथळा होत असून असाच प्रकार गुरूवारी (ता.तीन) घडला. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीने वंश परंपरेने चालत आलेल्या जागेत अंत्यविधीची क्रिया पार पडली. त्यामुळे मृत व्यक्तीच्या दुखापेक्षा नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्याचे कोडे पडत आहे.
तालुक्यातील अंबुलगा मेन येथील खंडू दगडू कांबळे यांचा बुधवारी (ता.दोन) सहा वाजता मृत्यू झाला होता. याच गावातील शेतकरी गोपाळ रावसाहेब शिंदे यांच्या जमीन सर्वे नंबर १ मध्ये वंश परंपरेने अंत्यसंस्कार करण्याची जागा आहे. मात्र स्मशानभूमीची जागा संपादित झाली असल्याने संबंधित शेतकऱ्याकडून अंत्यविधीस विरोध होता. याबाबत ग्रामस्थाने तहसिलदार व गटविकास अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन नियोजित जागी अंत्यविधी करण्यास परवानगीची मागणी निवेदनाद्वारे केली होती.
मात्र संबंधित शेतकऱ्याकडून विरोध होत असल्याने मृताचा मृतदेह अंत्यविधीविना अनेक तास ताटकळत ठेवण्यात आले होते. याबाबत तहसिला पंचायत समिती आणि पोलिस प्रशासन सदर घटनेबाबत भाग घेऊन नियोजित जागी अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण केली. गावातील मृताचा अंत्यविधीचा प्रश्न हे नित्याचीच बाब बनली आहे. मृत व्यक्तीच्या दुःखापेक्षा अंत्यविधीचे कोडे मृत झालेल्या कुटुंबियाला पडत आहे. यामुळे प्रशासनाने अंबुलगा मेन येथील स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी होत आहे. याबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता या गावातील स्मशानभूमीसाठी संपादित करण्याचा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवला आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
संपादन - गणेश पिटेकर