esakal | कोरोनाने थांबवला ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष! तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक दिसेनात
sakal

बोलून बातमी शोधा

Tuljabhavani Mandir

नवरात्र महोत्सवाला शनिवारपासून (ता.१७) प्रारंभ झाला. या काळात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आंध्र, तेलंगणा व कर्नाटकातील पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

कोरोनाने थांबवला ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष! तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक दिसेनात

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : नवरात्र महोत्सवाला शनिवारपासून (ता.१७) प्रारंभ झाला. या काळात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आंध्र, तेलंगणा व कर्नाटकातील पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. मात्र यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने थेट दर्शनाला आणि गर्दीला पायबंद घालण्यात आल्याने भाविक घरातच थांबले आहेत. हातात परडी घेऊन आई राजा उदो उदो, चा जयघोष करीत हजारो तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी निघालेले भाविकांनी राष्ट्रीय महामार्ग फुलून दिसायचा. आता फक्त दहा-पाच भाविकच तुळजाभवानी मातेच्या प्रवेशद्वारावर माथा टेकविण्यासाठी जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

भाविकांसाठी खुशखबर ! कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन घ्या ऑनलाईन

महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेवर श्रद्धा असलेल्या भाविकांची संख्या आंध्र, तेलंगणा व कर्नाटकात मोठ्या संख्येने आहे. नवरात्र महोत्सवात दर्शनासाठी वाहनांतून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. नवरात्रात पायी जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते. महामार्गावरील धार्मिकस्थळ, सभागृहात व सुरक्षित आडोशाला भाविक रात्री मुक्काम करत असतं.

लहान मुलापासून वयोवृद्ध नागरिक या पायी प्रवासात सहभागी झाल्याचे चित्र दिसून यायचे. मात्र यंदा कोरोना संसर्गाने चित्रच पालटले आहे. सध्या दर्शनच बंद असल्याने भाविकांची कुंचबना झाली आहे. दरम्यान नवरात्रीनंतर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेलाही दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. येत्या पंधरा दिवसात प्रशासन दर्शनासाठी काही सवलत देईल का या अपेक्षेने अनेक भाविक प्रतीक्षेत आहेत.

उद्यापासून शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर, नुकसानीची करणार पाहणी   

अन्नछत्राची राहोटी उभारलीच नाही !
उमरगा तालुका कर्नाटक सीमेवर आहे. तालुक्याच्या हद्दीत भाविकांनी प्रवेश केल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी अन्नछत्र व नाष्ट्याची सोय केली जाते. यंदा भाविकच नसल्याने अन्नदानाची इच्छा असूनही अनेक संघटना अन्नछत्र उभारले नाहीत. महामार्गावर अनेक ठिकाणी छोटे व्यावसायिकही दिसत नाहीत.

जादा बसेसचेही नाही नियोजन
तीन राज्यातून पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्याच्या तिप्पटीने खासगी वाहनासह एस.टी.महामंडळाच्या बसमधून भाविक दर्शनासाठी जातात. ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन दर्शन असल्याने तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली आहे. खासगी वाहने मोजके दिसतात. नवरात्रीत कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाकडून जादा बसेसची सोय असायची, यंदा प्रवाशी भाविकच नसल्याने नवरात्र महोत्सवासाठी खास बसेसचे नियोजन दिसत नाही.

संपादन - गणेश पिटेकर