बाजारात मेथी ठरलीय कवडीमोल,पिंपळगाव रेणुकाईमध्ये शेतकरी त्रस्त | Farmers In Jalna | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Methi

बाजारात मेथी ठरलीय कवडीमोल,पिंपळगाव रेणुकाईमध्ये शेतकरी त्रस्त

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) : परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मेथीचा भाजीपाल्याची लागवड केली आहे. मात्र बाजारात मेथीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. आठवडे बाजारातही भाव न मिळाल्याने अनेकांवर मेथीच्या जुड्या तशाच फेकून देण्याची वेळ आली. पिंपळगाव रेणुकाईसह परिसरामध्ये गतवर्षी अतिवृष्टीने हजेरी लावली. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन, मका, कपाशी आदी अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांवर लक्ष केंद्रित केले. तसेच मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पिकांची लागवड झाली. याशिवाय शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची पाण्याच्या उपलब्धतेच्या भरवशावर लागवड केली आहे. परंतु मोठ्या मेहनतीने लागवड केलेल्या मेथी आणि कोथिंबिरी सारख्या भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. (No Price For Methi, Farmers In Trouble In Jalna)

हेही वाचा: हिरडपुरीत द्राक्ष लागवडीचा प्रयोग यशस्वी, शेतकऱ्याच्या मेहनतीला मिळाले फळ

त्यातच कवडीमोल दरामुळे भाजीपाला (Vegetables) रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील काही शेतकऱ्यांनी मकाच्या पिकात मेथीच्या भाजीची लागवड केली होती. मक्याचे पीक काढणीला येण्यापूर्वी भाजीपासून आर्थिक फायदा मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आता भाव नसल्याने भाजीला शेंगा येत आहेत. पिंपळगाव रेणुकाईच्या बाजारात दहा रुपयांना मिळणारी मेथीच्या भाजीची जुडी, आता मात्र पाच रुपयाला दोन प्रमाणे विकाव्या लागल्या. अनेकांनी भाव न मिळाल्याने मेथीच्या जुड्या फेकून दिल्या. पुढील बाजाराच्या दिवशी भाववाढ मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.(Jalna)

हेही वाचा: मॅगीवरच काढावा लागतोय दिवस, युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची व्यथा

काही महिन्यांपूर्वी मेथीच्या भाजीला चांगला भाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मेथीच्या भाजीची लागवड केली. परंतु आता सगळीकडेच मेथीच्या भाजीचे उत्पन्न वाढल्यामुळे दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तर व्यापाऱ्यांनाही नुकसान सोसावे लागत आहे.

- गजानन तळेकर, व्यापारी, पिंपळगाव रेणुकाई

मेथीच्या भाजीला चांगला भाव मिळेल अशी आशा होती. मात्र उत्पादन वाढल्यामुळे मेथीच्या भाजीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भाजीच्या लागवडीसह फवारणी आणि इतरही मोठा खर्च केला. चांगला भाव मिळाला असता तर आर्थिक आधार मिळाला असता. परंतु आता भाव पडल्याने खर्च निघणेही अवघड झाले आहे.

- दीपक डोभाळ, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई

Web Title: No Price For Methi Farmers In Trouble In Jalna

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalnaMarathwadaFarmer