‘आरोग्या’तही सहा महिने थांब! भरतीची प्रक्रिया सात महिन्यांपासून थंडच

4Sakal_Vishesh_35
4Sakal_Vishesh_35

बीड : सरकारी काम अन् सहा महिने थांब ही जुनी म्हण आहे. पण, अत्यावश्यक व आता कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अगदीच तातडीची सेवा असणाऱ्या राज्याच्या आरोग्य विभागातही हीच गत आहे. विशेषज्ञ संवर्गाची राज्यात पाचशेंवर पदे रिक्त आहेत. खात्यांतर्गत निवड मंडळातर्फे १० विशेषज्ञांच्या एकूण ११७ पदांच्या भरतीची प्रक्रिया जानेवारीत सुरू झाली. पण पुढे प्रक्रिया थंडच आहे.


राज्याच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट, वर्ग-एक अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक अशा महत्त्वाच्या संवर्गासह इतर ग्रेड ‘सी’ व ‘डी’ अशी तब्बल १७ हजार पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, सहसंचालक, स्पेशालिस्ट अशा महत्त्वाच्या संवर्गाची तब्बल ७० टक्के पदे रिक्त आहेत. राज्याच्या आरोग्य विभागात स्पेशालिस्ट केडरची (विशेषज्ञ संवर्ग) गट-अ ६२७ पदे असून, यापैकी साधारण दीडशेवर पदे भरलेली आहेत.

पाचशेंच्या घरात रिक्त पदांपैकी १० विशेषज्ञांच्या एकूण ११७ पदांच्या भरतीची प्रक्रिया आरोग्य खात्यांतर्गत निवड मंडळातर्फे जानेवारी महिन्यात हाती घेण्यात आली. १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवण्यात आले. मात्र, सात महिन्यांनंतरही अद्याप प्रक्रिया पूर्णत्वाकडे गेलेली नाही. अगोदरच रिक्त पदे आणि प्रभारीराजमुळे आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर असताना आरोग्य खात्याची ही ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ची मानसिकताही रिक्त पदांचे मुख्य कारण ठरत असल्याचे समोर आले आहे.

अनेक जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, ट्रामा केअर सेंटर, बाल रुग्णालयांत विशेषज्ञांची पदे रिक्त आहेत. दरम्यान, सदर पदांसाठी खात्यांतर्गत सेवेत असणारे वैद्यकीय अधिकारी व या पदांसाठीची अर्हता पूर्ण करणारे पात्र असतात. यासाठी शैक्षणिक अर्हतेसोबत अनुभवही महत्त्वाचा आहे. यासाठीचे अर्ज मागवून झाले पण पुढील प्रक्रिया थंडच आहे. अशा काळात किमान आरोग्य विभागात तरी अशा प्रक्रिया वेगाने होण्याची गरज आहे.

या पदांसाठी मागितले अर्ज
- वैद्यकीय अधिकारी (कान-नाक-घसा तज्ज्ञ) : ०६ पदे.
- मनोविकृती चिकित्सक : २९ पदे.
- नेत्र शल्यचिकित्सक : १३ पदे.
- शरीरविकृती शास्त्रज्ञ : ०९ पदे.
- वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सक) : ११ पदे
- बधिरीकरण तज्ज्ञ : १२ पदे.
- वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ) : ०९ पदे
- क्ष-किरण शास्त्रज्ञ : १५ पदे.
- अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ : ०४ पदे.
- वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ज्ञ) : ०९ पदे
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com