लातुरात पैशाच्या जोरावर ऑक्सिजन बेड अडवण्यावर नजर, कोरोना काळात असाही प्रकार

विकास गाढवे
Wednesday, 9 September 2020

खासगी हॉस्पिटलमधील अनेक ऑक्सिजन बेड कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी अडवून ठेवले आहेत. खरे तर या रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज नाही.

लातूर : खासगी हॉस्पिटलमधील अनेक ऑक्सिजन बेड कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी अडवून ठेवले आहेत. खरे तर या रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज नाही. त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये किंवा गृहविलगीकरणात राहून उपचार शक्य आहेत; मात्र पैशाच्या जोरावर सुरू असलेला हा प्रकार आताच न रोखल्यास येत्या काळात अडचण होणार आहे.

यामुळे गरज नसताना ऑक्सिजन बेड अडवून ठेवलेल्यांची कोविड केअर सेंटर किंवा त्यांच्या इच्छेनुसार गृह विलगीकरणात रवानगी करण्याच्या सूचना रुग्णालयांच्या नोडल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. सोमवारी (ता. सात) रात्री फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात श्रीकांत यांनी या प्रकारावर खेद व्यक्त केला.

अवलिया अधिकारी : कधी 'वेड्यांची' कटींग, तर राहतात वसतीगृहात, चार...

सरकारी रुग्णालयात गरजूंनाच ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येतो. खासगी रुग्णालयात लोकांनी अनावश्यक ऑक्सिजन बेड अडवून ठेवल्याचे दिसत आहेत. अशा लोकांना विचारणा केल्यास ते पैसे भरल्याचे ठासून सांगतात. पैसा देता म्हणजे मेहरबानी करत नाहीत. गरज नसताना असा प्रकार म्हणजे दुर्दैव आहे. जिल्ह्यात सातशे लोकांनी घरी विलगीकरणात राहून कोरोनावर मात केली असताना पैशाच्या जोरावर ऑक्सिजन बेड अडवून ठेवण्याचा प्रकार चुकीचा आहे. असे सुरू राहिल्यास येत्या काळात गरजू रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार नाहीत.

यामुळे आतापासूनच असे प्रकार रोखण्यात येणार असून, तशा सूचना नोडल अधिकाऱ्यांना दिल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. ऑक्सिजन सिलिंडर कमी पडू नये म्हणून दोन्ही गॅस एजन्सीकडील सिलिंडरचे शंभर आरक्षण रुग्णालयासाठीच करण्यात आले आहे. रुग्णांवरील उपचारासाठी बेड पुरेशा संख्येने उपलब्ध असून, बेड उपलब्ध नसल्याच्या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठीच्या बिलांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णांकडून जास्तीचे घेतलेले पैसे परत करण्याचे आदेश रुग्णालयांना दिले आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी सोशल मीडियावर बिले न टाकता नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तरच न्याय मिळेल, असेही श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
धारूर किल्ल्याची नवीन भिंतही ढासळली, ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर

लॉकडाउन नाही, अविर्भाव नको
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन लागू केला जाणार असल्याच्या अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्रीकांत यांनी केले. रुग्णांचे घर लॉकडाउन होणार असून, काळजी म्हणून लोकांनी स्वतः लॉकडाउन झाल्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

अँटीजेननंतर ‘आरटीपीसीआर’ नाही
रॅपिड अँटीजेन तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकजण संशय व्यक्त करून आरटीपीसीआर (घशातील द्राव) तपासणीचा आग्रह धरतात. हे चुकीचे असून लक्षणे असूनही अँटीजेनमध्ये निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर करता येते. पॉझिटिव्ह आलेल्यांनी विनाकारण आरटीपीसीआरचा आग्रह धरू नये, असे सांगताना स्वतःला दोन दिवसांपूर्वी थंडी वाजून ताप आलेला असताना अँटीजेन तपासणी निगेटिव्ह आली, त्यानंतरच आरटीपीसीआर तपासणी केली व त्याचाही अहवाल निगेटिव्ह आल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non Serious Patients Occupy Beds In Private Hospitals Latur News