मद्यविक्री दुकानास परवानगी नको, पण व्यापाऱ्यांनी का बाजारपेठ बंद ठेवण्याचा दिला इशारा

प्रशांत शेटे
Saturday, 12 September 2020

चाकूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका जागेत मद्य विक्रीचे दुकान सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या ठिकाण हे दुकाने सुरू करण्यास परवानगी देऊ नये, असा ठरावही नगरपंचायतीने घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. तरीही या ठिकाणी दुकानास परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे.

चाकूर (जि.लातूर) : चाकूर शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेल्या मद्य विक्रीच्या दुकानास परवानगी देऊ नये. अन्यथा बाजारपेठे बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आला आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका जागेत मद्य विक्रीचे दुकान सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या ठिकाण हे दुकाने सुरू करण्यास परवानगी देऊ नये, असा ठरावही नगरपंचायतीने घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. तरीही या ठिकाणी दुकानास परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे.

कोरोनाच्या कचाट्यात ४३ केंद्रांवर नीट, लातूर जिल्ह्यातून १६ हजार ८८४ विद्यार्थी...

ही जागा बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी आहे. या ठिकाणापासून मंदिर, शाळा, मशिद हे जवळ असून चारही बाजूने घरे आहेत. तसेच परिसरात शिकवण्या चालतात. या ठिकाणी दारूचे दुकान सुरु झाल्यास बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना तसेच शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना मोठा त्रास होणार आहे. दारूच्या दुकानामुळे बाजारपेठेत गोंधळ निर्माण होणार असून इतर दुकानांमध्ये ग्राहक येणार नाहीत. यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी दारूचे दुकान होऊ नये. यासाठी नगरपंचायतीकडे निवेदन दिले होते.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार दारू दुकानाला बाजारपेठेत परवानगी देऊ नये असा ठराव नगरपंचायतीने दिला असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने याचा विचार न करता परवानगी दिली आहे. हा परवाना तातडीने रद्द करावा. अन्यथा बाजारपेठ बंद ठेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा उपनराध्यक्ष नितीन रेड्डी, सिध्देश्वर पवार, विठ्लराव माकणे, प्रभाकर करंजकर, बालाजी सुर्यवंशी, शिवाजी सुर्यवंशी, नारायण बेजगमवार, चाँद मासुलदार, रविंद्र निळकंठ, अॅड. संतोष माने, निरंजन रेड्डी, विलास सुर्यवंशी, अशोक शेळके, अर्जुन मद्रेवार, विजय होळदांडगे, रामकिशन बेजगमवार, एकनाथ सोलपुरे, जनार्धन देवकत्ते, बबुल फुलारी, सूरज शेटे, सुहास बेजगमवार आदींच्या स्वाक्षरी आहेत.

शेतकऱ्याला सर्वाधिक त्रास महावितरणच्या भोंगळ कारभाराचा; आमदार-खासदारांची...

व्यापाऱ्यांचा अपमान
मुख्य बाजारापेठेत दारू विक्रीचे दुकान सुरू करू नका अशी विनंती व्यापाऱ्यांनी जागा मालकाला केली असता तुम्ही तुमचा वेळ व पैसा खर्च करू नका. मी याच ठिकाणी दारूचे दुकान सुरु करणार आहे. असे अपशब्द काढून अपमानीत केल्यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not Give Permission To Liquor Shop, Traders Demand Latur News