‘एसबीआय’चे क्षेत्रीय कार्यालय लातूरलाच ठेवा, अर्थमंत्र्यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

लातूर येथे कार्यरत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे विभाजन करून ते बीड व नांदेड येथे केले जाणार आहे. त्याला लातूरकरांचा विरोध असून, विभाजनाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी अखिल भारतीय लघुउद्योग विकास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

लातूर : लातूर येथे कार्यरत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे विभाजन करून ते बीड व नांदेड येथे केले जाणार आहे. त्याला लातूरकरांचा विरोध असून, विभाजनाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी अखिल भारतीय लघुउद्योग विकास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. येथे २०१३ पासून भारतीय स्टेट बँकेचे कार्यालय कार्यरत आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ५० शाखांवर या कार्यालयाचे नियंत्रण आहे. २०१७ मध्ये काही बँकांचे विलीनीकरण झाल्याने शाखांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र क्षेत्रीय कार्यालये अस्तित्वात आली.

दोन्ही कार्यालये लातुरातच आहेत. एक जूनपासून होणाऱ्या नवीन रचनेत जिल्ह्यातील २१ शाखांपैकी लातूर शहरातील ११ शाखा, नव्याने सुरू होणाऱ्या दोन शाखांसह एकूण १३ शाखा होत आहेत. बीड जिल्ह्यातील १५ पैकी बीड शहरात पाच व उस्मानाबाद जिल्ह्यातील आठपैकी उस्मानाबाद शहरात तीन शाखा असे शाखांचे वेगळे वर्गीकरण करून त्यांचे शहरी व ग्रामीण असे दोन भाग होत आहेत. शहरासाठीचे क्षेत्रीय कार्यालय बीड येथे व ग्रामीण विभागासाठी नांदेडला क्षेत्रीय कार्यालय होत आहेत. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास सहा हजार कोटींच्या ठेवी स्टेट बँकेत आहेत. जवळपास आठ हजार कोटींचे कर्जाचे वाटपही असल्याची माहिती खंडापूरकर यांनी दिली.

यंदाची 'ईद' आगळी वेगळीच, तराबिह बरोबर ईदची नमाजही घरातच

...तर हेलपाटे मारावे लागतील
नव्या रचनेत लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांपैकी लातूर जिल्ह्यातील शाखांची संख्या जास्त आहे. लातूर येथे बँकेची स्वतःचा मालकीची सुसज्ज इमारत आहे. बीडमध्ये बँकेची स्वतःची जागा नाही. इतर बँका, विमा कंपन्या, केंद्रीय व राज्य शासनाची कार्यालये, अनेक प्रशासकीय कार्यालये पूर्वीपासून लातूरला आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे जाळेही लातूरमध्ये आहे. त्यामुळे आर्थिक राजधानीला हे जोडलेले शहर आहे. हे कार्यालय बीड व नांदेडला गेल्यानंतर लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजकांना कर्जमंजुरीसाठी बीड, नांदेडला हेलपाटे मारावे लागतील. त्यामुळे हे कार्यालय इतरत्र न हलविता लातूरलाच ठेवावे, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे केल्याची माहिती खंडापूरकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not Move SBI Regional Office From Latur