अंबाजोगाईत दवाखाने बंद, जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढली नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

अंबाजोगाई शहरात कोरोनाच्या व्हायरसमुळे दक्षता व काळजी घेण्याचे किट उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करून हे खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले होते

अंबाजोगाई (जि. बीड) - कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातल्याने राज्यात संचारबंदी आहे; परंतु अशा परिस्थितीत खासगी दवाखाने नेहमीप्रमाणे सुरू राहणे आवश्यक होते; परंतु शहरात काही डॉक्टरांनीच आपले रुग्णालय सुरू ठेवले आहेत. यांच्या तक्रारी येताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी नोटीस काढली आहे.

 शहरात कोरोनाच्या व्हायरसमुळे दक्षता व काळजी घेण्याचे किट उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करून हे खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले होते. काही डॉक्टरांनी मात्र नेहमीच्या रुग्णांना फोनवरच ट्रीटमेंट सुरू ठेवली होती. रुग्णालयात होणारी गर्दी, काळजी घेण्यासाठी लागणारी साधने उपलब्ध नसल्याने या डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. नोटिसीनंतर काही जणांनी ते सुरू केले. 

हेही वाचा - कोरोना विषाणू येऊच नये म्हणून....

रुग्णांच्या सेवेत आम्ही तत्पर आहोत. कोरोनाचा फैलाव सुरू असताना, वेगळ्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी काही दुरुस्त्या, बसण्याच्या व्यवस्थेत बदल करणे गरजेचे होते. रुग्णांनी फोनवर नोंदणी करूनच तपासणीसाठी यावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. काही रुग्णालयातील कर्मचारी वर्ग सुटीवर गेले, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पीटीई किट उपलब्ध होत नसल्याने रुग्णालय सुरू ठेवणे अवघड झाले होते. अशा परिस्थितीतही आम्ही २४ तास रुग्णांसाठी तत्पर असल्याचे अॅम्पाचे डॉ. सचिन पोतदार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notices issued by district surgeons