गांधी जयंतीदिनी काँग्रेसचे धरणे आंदोलन

हरी तुगावकर 
Thursday, 1 October 2020

केंद्र सरकारने नुकतेच शेतकरी आणि कामगार यांच्या संबंधित सुधारणा विधेयक संसदेमध्ये पारित करून घेतलेले आहे.

लातूर : केंद्र शासनाने शेतकरी आणि कामगारविरोधी विधेयकाला मंजुरी दिली आहे. याच्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरले आहे. यातून येथे दोन आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी काँग्रेसच्या वतीने येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. येथे जिल्हा काँग्रेस समिती आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस समितीची बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव होते. 

केंद्र सरकारने नुकतेच शेतकरी आणि कामगार यांच्या संबंधित सुधारणा विधेयक संसदेमध्ये पारित करून घेतलेले आहे. शेतकरी आणि कामगार यांच्यावर अन्याय करणारी विधेयके केंद्रातील भाजप सरकारने दडपशाहीने मंजूर केली आहेत. या विधेयकाच्या विरोधामध्ये शेतकरी व कामगारांत असंतोष आहे. त्यामुळे याच्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
 
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी पक्षाची भूमिका मांडत असताना काँग्रेस नेहमीच शेतकरी, कामगार मजूर यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. कृषीप्रधान देशाला भांडवलशाहीच्या आधारावर केंद्र सरकार घेऊन जात आहे. याचा विरोध म्हणून दोन ऑक्टोबर रोजी पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन केले जाणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. जाधव यांनी केले. या धरणे आंदोलनास लातूर जिल्हा निरीक्षक तथा विधान परिषदेचे नूतन आमदार राजेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

यावेळी जळकोट तालुकाध्यक्ष मन्मथअप्पा किडे, उदगीर तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, अहमदपूर तालुकाध्यक्ष डॉ. गणेश कदम, लातूर तालुका अध्यक्ष राजेसाहेब सवई, महिला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सुनीता आरळीकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अॅड. दीपक सूळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, स्वयंप्रभा पाटील, खाजाबानो बुऱ्हान उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रा.ओमप्रकाश झुरुळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सुधीर अनवले यांनी केले तर आभार शरद देशमुख यांनी मानले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the occasion of Gandhi Jayanti in Latur a protest will be organized by the Congress here