दीड कोटीच्या फसवणूक प्रकरणात पुन्हा एक अटकेत

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

  • आतापर्यंत तब्बल 15 आरोपी अटकेत 

औरंगाबाद : एलआयसीच्या जनश्री योजनेंतर्गत एक कोटी 47 लाख 80 हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील नकली मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या संशयिताला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. प्रल्हाद शिंपी (रा. शिंदाड, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे संशयिताचे नाव असून, तो ग्रामपंचायतीतील तत्कालीन लिपिक आहे. 

प्रकरणात अटकेतील आरोपी एजंट शांताराम गडवे (जळगाव रोड, औरंगाबाद) याने कबुली दिली, की जळगाव जिल्ह्यातील शिंदाडा येथून बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या माहितीच्या आधारावर आर्थिक गुन्हे शाखेने शिंदाडा गावात जाऊन संशयित प्रल्हाद शिंपी याला अटक केली. विचारपूस केल्यानंतर त्याने आरोपी गडवेला कोरे मृत्यू प्रमाणपत्र शिक्‍क्‍यांसह स्वाक्षऱ्या करून दिले असल्याची माहिती पोलिसांना दिली. प्रकरणातील गडवेचा भाऊ महेंद्र गडवे यालाही अटक करण्यात आलेली आहे. 

सोमवारपर्यंत पोलिस कोठडी 
शिंपी याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (ता.25) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी दिला. संशयिताने जनसेवा बहुउद्देशीय संस्थाद्वारे दाखल दाव्यात आठ बनावट मृत्यू प्रमाणपत्र दिले असून, मृत्यूची तारीख चुकीची आहे; तसेच जी व्यक्ती ज्या गावचा रहिवासी नाही त्या गावची प्रमाणपत्रेही देण्यात आली. गुन्हा घडला तेव्हा आरोपी ग्रामपंचायतीत लिपिक होता. दरम्यान, त्याने किती बनावट कागदपत्रे बनवली आहेत, कोणाला दिली आहेत, याचा तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one accused for corruption in LIC

टॉपिकस