रेल्वेला पावणेदोन कोटींचा फटका, लातूरला मालवाहतुकीचे महिनाभरातील चित्र

रेल्वेला पावणेदोन कोटींचा फटका, लातूरला मालवाहतुकीचे महिनाभरातील चित्र

लातूर ः लातूर येथून मोठ्या प्रमाणात रेल्वेने मालवाहतूक होते. एप्रिल, मे महिन्यात हे प्रमाण जास्त असते. यावर्षी कोरोनाच्या संकटाचा मोठा फटका रेल्वे मालवाहतुकीला बसला. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल या एकाच महिन्यात रेल्वेचे पावणेदोन कोटींचे नुकसान झाले आहे. दरवर्षी एप्रिलमध्ये सरासरी २४ हजार टन मालवाहतूक केली जाते. यावर्षी फक्त पाच हजार पाच टन साखरेची वाहतूक होऊ शकली आहे. कोरोनाचे संकट कायम असून हे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून केंद्र शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. रेल्वे मालवाहतुकीला सूट होती. त्यामुळे देशभरात मालवाहतूक सुरू राहिली. जिल्ह्यातील कारखानदार, उद्योजकांनी मालवाहतुकीला प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येत आहे.

सरासरी २४ हजार टन मालवाहतूक
येथील रेल्वेस्टेशनवरून दरवर्षी एप्रिल महिन्यात सरासरी २४ हजार टन मालवाहतूक होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रत्येकी ४५ डब्यांच्या नऊ रेक भरून मालाची वाहतूक झाली होती. ती २३ हजार ७१४ टन एवढी होती. मुंबईसह गुजरात व इतर राज्यांत ही मालवाहतूक होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नऊ रेक मालवाहतुकीतून रेल्वेला दोन कोटी ११ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी फक्त दोन रेक मुंबईला गेल्या असून यातून ३० लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनामुळे एका महिन्यात पावणेदोन कोटीचा फटका रेल्वेला बसला.


गोड साखरेची कडू कहाणी
लातूर येथून मोठ्या प्रमाणात साखर मुंबईसह इतर राज्यांत पाठवली जाते. दरवर्षी एप्रिलमध्ये किमान वीस हजार टन साखरेची वाहतूक होते. यावेळी कोरोनामुळे साखरेचा उठावच नाही. त्यामुळे एप्रिलमध्ये ज्या दोन रेक येथून गेल्या त्यातून फक्त पाच हजार टन साखरेची वाहतूक झाली. बहुतांश कारखान्यांच्या गोदामातच साखर पडून आहे. साखरेला उठाव नसल्याने कारखाने अडचणीत असून रेल्वेचेही नुकसान होताना दिसत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com