पीएम किसान : प्राप्तिकर भरणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांकडून वसूल होणार एक कोटी तेरा लाख

अविनाश काळे
Thursday, 26 November 2020

केंद्र सरकारने अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत (पी.एम.किसान) प्रत्येक वर्षाला तीन समान हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येणाऱ्या सहा हजार रुपये रक्कमेसाठी महसूल प्रशासनाने लाभार्थी निश्चित केले होते.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : केंद्र सरकारने अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत (पी.एम.किसान) प्रत्येक वर्षाला तीन समान हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येणाऱ्या सहा हजार रुपये रक्कमेसाठी महसूल प्रशासनाने लाभार्थी निश्चित केले होते. मात्र प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू नसताना या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसुली करण्यात येणार आहे. लवकरच महसूल विभागाकडून संबंधितांना रक्कम भरण्याचा तगादा लावण्यात येणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत धारण क्षेत्राची मर्यादा असलेल्या लाभार्थीच्या सर्वेनंतर तालुक्यात अल्पभूधारक व बहुभूधारक पात्र कुटुंब ४२ हजार तेरा आहे. त्यापैकी ३६ हजार ७६० पात्र शेतकरी कुटुंबांची यादी आधार क्रमांक व बँक खात्याच्या माहितीसह शासनाच्या महाऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली होती. चार हजार ५१६ शेतकरी स्थंलातरित, संयुक्त खाते असलेली संख्या ९९५ तर मृत शेतकऱ्यांची संख्या ८१२ आहे.

एक कोटी १३ लाख होणार वसूल
उमरगा तालुक्यातील ९६ गावापैकी भिकार सांगवी, कसगीवाडी, थोरलीवाडी, नाईकनगर (सुंदर वाडी), भगतवाडी, अनंतपूर, गुंजोटीवाडी, गुरूवाडी या आठ गावात एकही वसुली पात्र शेतकरी नाहीत. मात्र ८८ गावात इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी पीएम किसान योजनेच्या यादीत आले आणि त्यांनी योजनेची रक्कम उचलली आहे. मुरुम ६१, आलुर ५५, केसरजवळगा ५७, उमरगा शहराच्या हद्द शिवारातील ४८, मुळज ४२, बलसूर ३३, दाळींब २३, गुंजोटी ३०, कवठा ३३, बेडगा २३, नारंगवाडी ३२, डिग्गी ३२, कसगी व तुरोरी २० अशी कमी-अधिक प्रमाणात अन्य गावात प्राप्तिकर  भरणाऱ्या एक हजार ११५ शेतकऱ्यांकडून एक कोटी १३ लाख ६२ हजार रुपये वसुल करण्यात येणार आहेत.

रक्कम भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार
प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी उचल केलेली रक्कम भरण्याच्या सूचना महसूल विभागाकडून दिल्या जात आहेत. बरेच शेतकरी तहसील कार्यालयात रक्कम भरण्याविषयीची माहिती घेण्यासाठी येत आहेत. ही रक्कम तलाठ्याकडे जमा करण्याच्या तोंडी सूचना असल्या तरी वरिष्ठ कार्यालयाकडून रक्कम जमा करून घेण्याविषयीचा नेमकी प्रक्रिया कोणती याबाबत लवकरच आदेश प्राप्त होणार आहेत. तहसील विभागाच्या शासकिय बँक खात्यावर रक्कम भरण्याविषयी प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Crore Will Collect From Tax Payer Farmers In Umarga Taluka