अंत्यसंस्काराहून परततानाच काळाचा घाला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराहून परतत असताना भोकरदन-जालना मुख्य रस्त्यावरील सोयगावदेवी पाटीजवळ जोमाळा गावाकडून येणारे ट्रॅक्‍टर अचानक रस्त्यावर आले. त्यात दोन्ही वाहनात जोराची धडक झाली.

भोकरदन (जि.जालना) - ट्रॅक्‍टर व दुचाकी अपघातात वृद्ध दांपत्य गंभीर जखमी झाले होते. यातील पतीचा उपचारासाठी नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.14) दुपारी तीन वाजेच्या सुमारास भोकरदन जालना मुख्य रस्त्यावरील सोयगावदेवी पाटीवर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील लिंगेवाडी येथील गुलाबराव हिंमतराव साबळे (वय 70) हे पत्नी पंखाबाई साबळे यांच्यासह शुक्रवारी निल्लोड (ता. सिल्लोड) येथे नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. येथून परतत असताना भोकरदन-जालना मुख्य रस्त्यावरील सोयगावदेवी पाटीजवळ जोमाळा गावाकडून येणारे ट्रॅक्‍टर अचानक रस्त्यावर आले. त्यात दोन्ही वाहनात जोराची धडक झाली.

हेही वाचा : भोकरदनला उपजिल्हा रुग्णालयाची आस 

या धडकेत गुलाबराव व त्यांच्या पत्नी जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, गुलाबराव यांचा पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविताना रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेचा पोलिस कर्मचारी डी.जे.शिंदे यांनी पंचनामा केला असून, याप्रकरणी भोकरदन पोलिसात अपघाताची नोंद घेण्यात आली.

जीपच्या धडकेत एक ठार

परतूर : येथील मसला रस्त्यावर शुक्रवारी (ता. 14) सकाळी साडेसात वाजता भरधाव वेगात जाणाऱ्या जीपची धडक लागून सायकलवर जाणारे काझी अजिमोद्दीन अब्दुल अजीज काझी (रा. काझी मोहल्ला, परतूर) हे ठार झाले. याप्रकरणी काझी जमीर अहमद (रा. परतूर) यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिस ठाण्यात संशयित ज्ञानेश्‍वर देवराव काळे (वय 32, रा. मसला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dead in accident near Bhokardan