लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका मृत्यूचे कारणे दोन, काय घडले?

हरी तुगावकर
बुधवार, 24 जून 2020

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने एका कोरोनाबाधित ३८ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूसंदर्भात पोलिस ठाण्याला कोरोनाचे तर महापालिकेला मधुमेहाचे कारण दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने एका कोरोनाबाधित ३८ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूसंदर्भात पोलिस ठाण्याला कोरोनाचे तर महापालिकेला मधुमेहाचे कारण दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या रुग्णावर कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार होऊनही बुधवारी (ता.२४) दुपारपर्यंत या रुग्णाच्या कुटुंबीयाच्या स्वॅब नमुन्याची तपासणीही झाली नाही किंवा त्या भागात प्रतिबंधित क्षेत्रही (कंटेनमेंट झोन) जाहीर करण्यात आला नाही. हा प्रकार म्हणजे इतर नागरिकांच्या जिवाशी खेळल्यासारखाच आहे. याची वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज आहे.
----
नगरसेवकाच्या फोननंतर हलली यंत्रणा
---
येथील प्रभाग दोनमधील गाझीपुरा भागातील एका व्यक्तीला सोमवारी (ता.२२) त्रास होऊ लागला होता. स्वतःतील लक्षणे लक्षात आल्यानंतर तो रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी गेला होता; पण त्याला परत पाठविण्यात आले. त्यानंतर या भागातील नगरसेवक सचिन बंडापल्ले यांनी तातडीने महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत माले यांना ही माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी (ता.२३) सकाळी ८.३४ वाजता या रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले.
---
बारा तासांत रुग्णाचा मृत्यू
---
हा रुग्णांच्या शरीरात लक्षणाची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. या रुग्णाला मंगळवारी सकाळी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अवघ्या बारा तासांत म्हणजे रात्री नऊ वाजता या रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यातून हा रुग्ण गंभीर परिस्थितीत होता हे लक्षात येते.
---
पोलिस ठाण्याला माहिती कोरोनाची
---
या वैद्यकीय महाविद्यालयाने रात्रीच पोलिसांना एक पत्र दिले. कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुढील कारवाई करावी असे या पत्रात नमूद केले आहे. बुधवारी (ता.२४) रात्री दीड वाजता याप्रकरणी विवेकानंद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. यात रुग्णाच्या मरणाचे कारण कोरोनाबाधित असे नमूद करण्यात आले आहे.
----
महापालिकेला सांगितले मधुमेह
----
वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने महापालिकेलाही एक पत्र दिले. या पत्रात रुग्णाच्या मृत्यूचे कारणही महाविद्यालयाने दिले. त्यात या रुग्णाला मधुमेह व हायपरटेन्शन असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात कोरोनाने त्याचा मृत्यू झाल्याचे कोठेही नमूद नाही.
-----
अंत्यसंस्कारानंतरही `कंटेनमेंट` नाही
--
या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग दिवसभर शांतच राहिला. संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयाचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले नाहीत. इतकेच नव्हे तर रुग्ण राहत असलेल्या भागात प्रतिबंधित (कंटेनमेंट) क्षेत्र जाहीर करून उपाययोजना सुरू केल्या नाहीत; पण या रुग्णावर रात्रीच कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. असे असताना पुढे काहीच उपाययोजना झाल्या नाहीत. हा प्रकार इतर नागरिकांच्या जिवाशी खेळल्यासारखाच आहे.
----
कोट
----
या रुग्णाचा स्वॅबचा अंतिम अहवाल आलेला नाही. त्याचा मृत्यू कोरोनाबाधित झाल्यामुळे झालेला नाही. तरी पत्राच्या संदर्भात नेमका काय प्रकार घडला आहे, याची माहिती घेतली जाईल.
- डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था.
----
कोट
---
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून रुग्णाचे मृत्यूच्या कारणाचे एक प्रमाणपत्र दिले जाते. यात या रुग्णाच्या संदर्भात कोरोनाबाधित आहे, असा उल्लेख नाही. त्याला मधुमेह व हायपरटेंन्शन होते असे लिहिले आहे. त्यामुळे आम्ही तो ज्या भागात राहत होता तेथे कंटेनमेट झोन केला नाही.
डॉ. प्रशांत माले, आरोग्य अधिकारी, महापालिका, लातूर
--


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Death Two Reasons, Inccident Took Place In Medical Collage Latur