महाविद्यालयीन कर्मचाऱ्याकडून गरजू कुटुंबांना एक लाख मदत 

पांडुरंग उगले 
Sunday, 29 March 2020

बाहेर कामच नसल्याने कुटुंबातील चिल्यापिल्यांच्या उदरनिर्वाहाच्या काळजीने त्यांची झोप उडाली आहे. अशा संकटात महाविद्यालयीन कर्मचारी एकनाथ मस्के यांच्या मनातील दातृत्वाची भावना जागी झाली अन् प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे गावातील दोनशे कुटुंबांना एक लाख रुपयांचे वाटप त्यांनी केले.

माजलगाव (जि. बीड) - कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्या कुटुंबांची मात्र मोठी परवड होतेय. अशा संकटात सामाजिक दायित्व म्हणून महाविद्यालयीन कर्मचारी एकनाथ मस्के (रा. पात्रुड, ता. माजलगाव) यांनी दोनशे कुटुंबांना प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे एक लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यांचा हा उपक्रम दानशूरांसाठी आदर्श ठरला आहे. 

जगात थैमान घालणारा कोरोना व्हायरस देशासह महाराष्ट्रात वेगाने पसरत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधानांनी पाच दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झालेत. अशा परिस्थितीत हातावर पोट असलेल्या कुटुंबांतील नागरिकांची परिस्थिती गंभीर बनली आहे. बाहेर कामच नसल्याने कुटुंबातील चिल्यापिल्यांच्या उदरनिर्वाहाच्या काळजीने त्यांची झोप उडाली आहे. अशा संकटात महाविद्यालयात वीस, पंचवीस हजारांवर काम करणारे कर्मचारी एकनाथ मस्के यांच्या मनातील दातृत्वाची भावना जागी झाली अन् प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे गावातील दोनशे कुटुंबांना एक लाख रुपयांचे वाटप त्यांनी केले.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

गावात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दिवसभर काम केल्याशिवाय रात्री घरची चूल पेटत नाही. सद्यःस्थितीत सर्वच व्यवहार ठप्प असल्याने रोजीरोटी करणारे कुटुंब संकटात सापडलेत. यामुळे गावातील वृद्ध कुटुंब, गरजवंत कुटुंबातील नागरिकांची यादी तयार करून जीवनावश्यक वस्तूंसाठी पैसे दिले. महाविद्यालयात कर्मचारी असलेल्या एकनाथ मस्के यांच्या या संवेदनशील उपक्रमाने समाजातील दानशूर व्यक्तींसमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे. 

पगार गरीब कुटुंबांसाठी 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह महाराष्ट्र लॉकडाऊन केला आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या जाहीर करून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे घरात बसून मिळणारा शासनाचा पगार हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांसाठी देण्याचा मानस एकनाथ मस्के यांनी बोलून दाखविला. 
 

स्वतः गरीब कुटुंबातील असल्याने अशी संकटकालीन परिस्थिती मी अनुभवली आहे. हाताला काम नसल्याने अशा कुटुंबाला मदतीची खरी गरज आहे. सामाजिक दायित्व म्हणून छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न केला. सध्या देशातील गोरगरीब कुटुंबांवर मोठे संकट असल्याने आता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. 
- एकनाथ मस्के, पात्रुड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh help to elderly families