मयत शेतकऱ्याच्या नावावर उचलले एक लाखाचे कर्ज, युनियन बॅंक ऑफ इंडियाचा प्रताप, शाखा व्यवस्थापकासह १३ जणावर गुन्हा दाखल

पंजाब नवघरे 
Sunday, 10 January 2021

या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात युनियन बॅंक शाखा व्यवस्थापक, तलाठी, मंडळ अधिकारी, दुय्यम निबंधक, व बॅंकेतील इतर कर्मचारी अशा १३आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत (जिल्हा हिंगोली ) : वसमत तालुक्यातील चौंढीतर्फे सेंदुरसना येथील १५ वर्षापूर्वी मयत झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर तब्बल एक लाख पाच हजार रुपयाचे पीक कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली असून या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात युनियन बॅंक शाखा व्यवस्थापक, तलाठी, मंडळ अधिकारी, दुय्यम निबंधक, व बॅंकेतील इतर कर्मचारी अशा १३ आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वसमत तालुक्यातील चौंढीतर्फे सेंदुरसना येथील शेतकरी कनीराम नामदेवराव राठोड हे चार जून २००५ रोजी मयत झाले आहेत. मात्र त्यांच्या नावे असलेला गट क्रमांक १३५ मधील एक हेक्टर ६८ आर या शेत जमिनीचे बनावट कागदपत्रे जमा करुन मयत शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना कोणतीही भनक लागू न देता तब्बल एक लाख पाच हजार रुपयाचे कर्ज उचलल्याची बाब माहिती अधिकारी कार्यकर्ता नदाफ म. बशीर यांच्या माध्यमातून उघड झाल्याने या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे.

हेही वाचा - हिंगोलीत कोरोना लसीची रंगीत तालिम पुर्ण 

या प्रकरणी नदाफ म. बशीर यांनी यापूर्वीही वेळोवेळी तक्रार दिली होती. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तक्रारदाराने पुराव्यासह पुन्हा तक्रार केल्याने या प्रकरणात वसमत युनियन बॅंकेचे व्यवस्थापक, कर्ज वितरण शाखा व्यवस्थापन, बॅंक खाते तपासणी अधिकारी, रोखपाल, कॅशियर, खाते उघडणे संदर्भात साक्षीदार म्हणून ओळखपत्र दिलेली व्यक्ती, सदर कर्ज मंजुरीसाठी सर्च रिपोर्ट देण्याकामी बॅंकेने नियुक्त केलेले विधिज्ञ तज्ञ वकील, राजकुमार स्वामी, अधिकृत मुद्रांक विक्रेता, दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालय, चौंढीतर्फे सेंदुरसना सज्जाचे तलाठी वाघिले, कुरुंदा महसुल मंडळ अधिकारी अंभोरे, दुय्यम निबंधक अधिकारी उखडे, बनावट ओळखपत्र तयार करुन देणारी व्यक्ती व संस्था, बनावट आधारकार्ड बनवून देणारी व्यक्ती व संस्था, तसेच बनावट पॅनकार्ड बनवून देणारी व्यक्ती व संस्था अशा १३ आरोपीविरुध्द नदाफ म. बशीर खान यांच्या फिर्यादीवरुन भारतीय दंड संहिता विविध कलमान्वये वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे हे करीत आहेत.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh loan taken in the name of deceased farmer, Pratap of Union Bank of India, case filed against 13 persons including branch manager hingoli news