
केज तालुक्यातील बेलगाव येथे पिस्तूल रोखून चार जणांनी एकास मारहाण केली.
केज (जि.बीड) : तालुक्यातील बेलगाव येथे पिस्तूल रोखून चार जणांनी एकास मारहाण केली. शिवाय चाकूने भोसकले. ही घटना बुधवारी (ता. ३०) घडली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. केज पोलिस ठाण्यात पांडुरंग रघुनाथ चौरे यांनी गुरुवारी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, बुधवारी रात्री अकराच्या सुमारास गावातील प्रताप नरसिंग दातार, नरसिंग लिंबाजी दातार आणि दोन अनोळखी व्यक्तींनी पांडुरंग यांच्या घरासमोर येऊन त्यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखले.
‘तुझा भाऊ कुठे गेला?’ अशी विचारणा करीत त्यांना चाकूने मारहाण केली. यात पांडुरंग यांच्या डाव्या हाताच्या पोटरीला दुखापत झाली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या चुलत भावालाही काठी व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. अशाप्रकारे दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात प्रताप दातार, नरसिंग दातार यांच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीराम काळे करीत आहेत.
Edited - Ganesh Pitekar