
विभागातील अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे.
औरंगाबाद : विभागातील अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. मराठवाड्यातील ४४ अव्वल कारकुन आणि मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदावर पदोन्नती मिळाली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेशात म्हटले आहे, की औरंगाबाद विभागातील अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातीतल कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार गट ब या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. नियमित पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्तपदांवर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील रिक्तपदांवर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे.
या पदोन्नत्या तात्पुरत्या स्वरुपाच्या असल्याचे याबाबातच्या आदेशात म्हटले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या अधिकारी वगळता इतरांना पदोन्नतीच्या जागेवर रूजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश शासनादेशात दिले आहेत. नियमित पदोन्नती कोट्यातुन अव्वल कारकुन संवर्गातील १५ जणांना तसेच ८ मंडळ अधिकाऱ्यांना खुल्या संवर्गातून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच सरळसेवा कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने १४ अव्वल कारकुन तर ७ मंडळ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
संपादन - गणेश पिटेकर