कुऱ्हाडीचे घाव घालून एकाचा खून; राहोली बुद्रुक येथील घटना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

हिंगोली तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे शंकर लक्ष्मण डोरले (वय 35) यांचा त्यांच्या शेताच्या शेजारी असलेले गणेश रामकिशन डोरले व इतरांसोबत मागील चार महिन्यापुर्वी धुऱ्याच्या कारणावरून वाद झाला होता.

हिंगोली : तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे धुऱ्याच्या कारणावरून कुऱ्हाडीचे घाव घालून एकाचा खून करणाऱ्या सात जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 22) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. 

हिंगोली तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे शंकर लक्ष्मण डोरले (वय 35) यांचा त्यांच्या शेताच्या शेजारी असलेले गणेश रामकिशन डोरले व इतरांसोबत मागील चार महिन्यापुर्वी धुऱ्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी (ता. 21) सायंकाळी हा वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी गणेश रामकिसन डोरले, आंबादास उर्फ बाबुश्या नामदेव घोंगडे, विठ्ठल नामदेव घोंगडे, ज्ञानेश्वर किसन बोरगड, मारोती विठ्ठल डोरले, रामकिसन पंडीता डोरले, नामदेव तुकाराम घोंगडे यांनी शंकर लक्ष्णण डोरले यांना मारहाण केली. त्यानंतर गणेश डोरले याने शंकर डोरले यांच्या डोक्यात, कपाळावर कुऱ्हाडीचे घाव घातले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, सायंकाळी उशीरा या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अंगद सुडके, उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार गजानन पोकळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र जो पर्यंत आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हालवू देणार नाही अशी भुमीका मयत शंकर डोरले यांच्या नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर रात्री बारा वाजता मृतदेह हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला. त्यानंतर उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या पथकाने रात्री छापासत्र सुरु करून चौघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी लक्ष्मण गणपती डोरले यांच्या तक्रारीवरून वरील सात जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आज पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One man murdered by Kurhad An incident in Raholi Budruk Hingoli