मतदारसंघासाठी एक हजार कोटींची कामे मंजूर -प्रशांत बंब

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

औरंगाबाद : गंगापूर-खुलताबाद मतदारसंघासाठी पाच वर्षांत एक हजार कोटींच्या कामांचा निधी मंजूर करून आणला आहे. राज्यात सर्वांत जास्त निधी मतदारसंघात आणणारा आणि प्रत्यक्षात काम करवून घेणारा मी चौथा आमदार आहे, असा दावा गंगापूर-खुलताबाद महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब यांनी मंगळवारी (ता.15) पत्रकार परिषदेत केला. 

औरंगाबाद : गंगापूर-खुलताबाद मतदारसंघासाठी पाच वर्षांत एक हजार कोटींच्या कामांचा निधी मंजूर करून आणला आहे. राज्यात सर्वांत जास्त निधी मतदारसंघात आणणारा आणि प्रत्यक्षात काम करवून घेणारा मी चौथा आमदार आहे, असा दावा गंगापूर-खुलताबाद महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब यांनी मंगळवारी (ता.15) पत्रकार परिषदेत केला. 

मतदारसंघात केलेल्या कामांच्या कार्यअहवाल पुस्तिकेची माहिती श्री. बंब यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले, की पाच वर्षांत मतदारसंघातील रस्त्यांसाठी एक हजार 80 कोटी रुपये आणले. यातील 600 कोटींची कामे जवळपास संपली आहेत. 200 कोटींची सुरू आहेत. आमच्याच सरकारने मराठा आरक्षण दिले. मी आणि विनोद पाटील मिळून न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले. 
 

पाणी वाटपासाठी 428 कोटींची योजना 
समन्यायी पाणी वाटपाअंतर्गत वॉटरग्रीडची योजना सुरू होत आहे. सिंचनासाठी 428 कोटींची योजना मंजूर केली. लखमापूर ते सुलतानाबाद सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी संपून जानेवारीपासून पाइपलाइनला सुरवात होणार आहे. 48 गावांमध्ये शंभर टक्‍के सिंचन केले जाणार आहे. 35 हजार एकर जमिनीला फायदा होणार आहे. यासाठी जायकवाडीचे पाणी मिळाले आहे. कामाचे टेंडरही निघाले आहे.

मतदारसंघातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी मदत केली. 17 हजार शेतकऱ्यांचा याचा लाभ झाला. दररोज दोनशे ते तीनशे अर्ज भरून घेत आहोत. यासह अंत्योदय योजनेच्या माध्यमातून कामगारांसाठी वेगवेगळ्या किट, बॅंक खाते उघडून दिले आहे. गंगापूर कारखान्याचा विषय न्यायालयात आहे. कारखान्याचे 17 कोटी रुपये आम्ही न्यायालयाकडे जमा केले असून, सव्वासात कोटी रुपये देण्याला आम्ही तयार आहोत. या कारखान्याची जागा खासगी लोकांच्या घशात घालायची आहे, म्हणून जयंत पाटील यांनी तो विकत घेतला आहे, असा आरोपही श्री. बंब यांनी केला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One thousand crore works approved for constituency - Prashant Bomb