हॉटेलातल्या भजींमधून कांदे गायब 

अरुण ठोंबरे
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

केदारखेडा (जि. जालना) : भाव वाढल्याचा परिणाम, भोपळा, काकड्यांचा वापर 

केदारखेडा (जि. जालना) - पावसाच्या सरींमध्ये हॉटेलातला वाफाळलेला चहा आणि सोबतच कांदाभजीचा बेत असे चित्र ग्रामीण भागात पावसाळ्यात हमखास दिसते. असे असले तरी कांद्याचे भाव साठ ते सत्तर रुपये किलोप्रमाणे तेजीत आल्याने छोटे हॉटेलचालक अडचणीत आले आहेत. अनेकांनी भजींमधील कांदे गायब केले आहेत, त्याऐवजी भोपळा, काकड्यांचा वापर सुरू केला आहे. 

जालना-भोकरदन महामार्गावरील बसस्थानक परिसरात अनेक हॉटेलचालक भजी तळण्यात कायम मग्न असतात. रस्त्यावरून जाणारे प्रवासी वाहने थांबवून आवर्जून येथील कांदाभजी आणि सोबत कढीचा अस्वाद घेतात. कांद्याचा भाव जोपर्यंत पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे होता तोपर्यंत काही समस्या नव्हती. मात्र, अचानक कांद्याच्या भावाने डोळ्यांत पाणी आणणे सुरू केले. भाव चक्‍क साठ ते सत्तर रुपयांपर्यंत पोचला. त्यामुळे नेहमी पंधरा रुपये प्लेटप्रमाणे देण्यात येणारी कांदाभजी आता वीस रुपयांना देणेही परवडत नसल्याने हॉटेलचालक त्रस्त झाले. त्यामुळे अनेकांनी कांद्याऐवजी पालक, कोथिंबीर, काकड्या, भोपळा, मिरचीची भजी बनविणे सुरू केले आहे.भजींच्या चवीत वैविध्य आले असले, तरी कांदाप्रेमींचा मात्र हिरमोड होत आहे. त्यामुळे जरा जास्तीचे पैसे आकारत काही खव्वयांसाठी विशेष कांदाभजीही तळली जात आहे. 

कांदा महागल्याने भजी विक्रेत्यांची अडचण होत आहे. नाइलाजाने कांद्याऐवजी आता भजींसाठी भोपळा, पालक आदींचा वापर सुरू केला आहे. कांद्याचे भाव उतरेपर्यंत अशी स्थिती राहील. 
- सुनील जाधव, हॉटेलचालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion price hike