लातूर जिल्ह्यातील १४२ प्रकल्पांत केवळ २७ टक्के जलसाठा, दमदार पावसाची प्रतिक्षा

हरी तुगावकर
Monday, 21 September 2020

लातूर जिल्ह्यातील १४२ प्रकल्पांत केवळ २७ टक्के जलसाठा आहे. आता लातूरकरांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

लातूर : जायकवाडीसह नांडेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील धरणे ओव्हरफ्लो झालेली असताना लातूर जिल्हा काहीसा मागेच आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे काही मध्यम व लघुप्रकल्पांत पाणी आले असले तरी एकूण आकडेवारी पाहता जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या १४२ प्रकल्पांत केवळ २७ टक्केच जलसाठा आहे. या १४२ प्रकल्पांचा प्रकल्पीय पाणीसाठा ६९७.६४ दशलक्ष घनमीटर असून सध्या केवळ १८८.२३ दशलक्ष घनमीटर साठा आहे. अनेक प्रकल्प कोरडेच आहेत.

आहारात पोषक घटकांची कमतरता, नगदी पीक घेत असल्याचा परिणाम

जूनमध्ये पावसाला सुरवात झाली; पण मधल्या काळात लपंडाव सुरू होता. पावसाळा संपत आला तरी सातत्यपूर्ण आणि मोठा पाऊस न झाल्याने धरणांची ही स्थिती आहे. आता परतीच्या पावसाकडे नजरा आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणात ८८ दशलक्ष घनमीटर, तर निम्न तेरणा प्रकल्पात ३६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.

आठपैकी दोन मध्यम प्रकल्पांत २५ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. चार प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षाही कमी साठा आहे. एका प्रकल्पातील पाणी जोत्याखाली आहे, एक प्रकल्प कोरडा आहे. या आठ मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय पाणीसाठा १४७.१० दशलक्ष घनमीटर असून सध्या ३१.६९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. टक्केवारी ११.८७ इतकी आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने एकूण १४२ प्रकल्प असून मोठे दोन, मध्यम आठ आणि १३२ लघुप्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांचा प्रकल्पीय साठा ८३३.५५ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या ३११ दशलक्ष घनमीटर साठा आहे. टक्केवारी २७.०७ इतकी आहे.

कोरोना झाला पण मदतीचा यज्ञ थांबला नाही, बीडच्या सोहनींचा थक्क करणारा प्रवास...

शंभर टक्के भरलेले लघुप्रकल्प
अहमदपूर तालुक्यातील कौडगाव, येस्तार, येलदरी, ढाळेगाव, हगदळ, अहमदपूर, अंधोरी, उगिलेवाडी, सावरगाव, हंगेवाडी, नागझरी, देवणी तालुक्यातील दवनहिप्परगा, वडमुरंबी, गुरनाळ, आनंदवाडी, लासोना, जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी, हावरगा, धोंडवाडी, सोनाळा, गुत्ती क्रमांक एक, रावणकोळा, माळीहिप्परगा, चेरा क्रमांक दोन, डोंगरकोनाळी, उदगीर तालुक्यातील नागलगाव.

मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा

तालुका---   प्रकल्प -------  -प्रकल्पीय उपयुक्त साठा---- उपयुक्त साठा----टक्केवारी
लातूर----तावरजा-----------------२०.३४------------------कोरडे---------------००.००
रेणापूर---व्हटी-----------------८.२७----------------------जोत्याखाली--------००.००
रेणापूर--रेणापूर-----------------२०.५५----------------४.१८----------------२०.३८
उदगीर------तिरू-------------१५.२९------------------४.१७--------------२७.२७
उदगीर------देवर्जन-------------१०.६८----------------२.९७--------------२७.८९
शिरूर अनंतपाळ-----साकोळ--------१०.९४----------------१.७१-----------------१५.६२
शिरूर अनंतपाळ-----घरणी---------२२.४५------------------०.८५५-------------३.८१
निलंगा-----------मसलगा-----------१३.५९---------------०.५९-------------४.३४
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 27 Percent Water Stock In Major Water Dams Latur News