esakal | आडत बाजारात दुपारी बारापर्यंतच प्रवेश, लातूरच्या बाजार समितीचा निर्णय

बोलून बातमी शोधा

Latur APMC News

शेतीमालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या वाहनांना पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे.

आडत बाजारात दुपारी बारापर्यंतच प्रवेश, लातूरच्या बाजार समितीचा निर्णय
sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने आडत बाजाराच्या कालावधीवर मर्यादा आणल्या आहेत. यातूनच सोमवारपासून (ता. १५) आडत बाजारात शेतीमालाच्या विक्रीसाठी पहाटे पाच ते दुपारी बारापर्यंतच वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. भुसार सौदाही सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे. आडतबाजारातील सर्व व्यवहार रात्री आठवाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सभापती ललितकुमार शहा यांनी दिली.


समितीच्या शनिवारी (ता. १३) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार व प्रशासनाने अनेक सूचना दिल्या असून, त्याचे पालन करण्यासाठी बाजार समितीने पहिले पाऊल टाकले आहेत. यातूनच सोमवारपासून आडतबाजाराच्या वेळेवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. सोमवारपासून दररोज सकाळी नऊ वाजता भुसार सौदा सुरू होणार असून, त्यानंतर अन्य सर्व सौदे होतील.

शेतीमालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या वाहनांना पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. तर व्यापाऱ्यांच्या वाहनास दुपारी एक ते सहा वाजेपर्यंत बाजार आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. बाजारातील सर्व व्यवहार रात्री आठ वाजता पूर्ण करून घेण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सभापती शहा यांनी सांगितले. या निर्णयाचे व्यापारी व शेतकऱ्यांनी पालन करावे, असे आवाहन श्री. शहा, उपसभापती मनोज पाटील व सचिव बी. डी. दुधाटे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या मुलींसाठी वसतिगृह
बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांच्या मुलींसाठी माफक दरात वसतिगृह उभारण्याचे काम सुरू आहे. यापुढील काळातही समितीच्या वतीने शेतकरी हिताचे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती सभापती शहा यांनी दिली. समितीच्या बुधवारी (ता. दहा) आयोजित १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पाच वर्षांत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे निर्णय घेऊन कोरोना काळात बाजार समितीने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. शेतमाल तारण योजनेतून शेतकऱ्यांना वाढीव भावाचा लाभ दिल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर