मोबाईलच्या डायल टोनवर ‘खो..खो...’

नवनाथ येवले
Saturday, 7 March 2020

कोरोनाची दहशत ; सोशल मिडियावर दक्षता, उपाय योजनांचे वादळ, यंत्रणेकडून जागृती मोहिम, शाळेच्या परिपाठात दक्षता पत्रकांचे वाचन घरभेटींसह होर्डींग्ज, बॅनरद्वारे जागृती 

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. जिल्ह्यातही कोरोना प्रादूर्भावाबाबत जिल्हा प्रशासनाकडून जागृती मोहिम राबवण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून थेट ग्राहकांच्या मोबाईल डायलर टोनच बदलण्यात आल्या आहेत. खोऽऽऽ खोऽऽऽऽ आवाज देत कोरोनाचा प्रादूर्भाव कसा रोखायचा? याच्या सूचना या डायलर टोनमधून मिळत आहेत. शाळेच्या परिपाठामध्ये दक्षता परिपत्रक वाचनाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

चीनमधील बुहान प्रांतातील कोरोना या विषाणु व्हायरसने आता जगभरात उच्छाद मांडला आहे. भारतातही कोरोनाचे संशयित रूग्ण आढळून आल्याने देशभरात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासनस्तरावरून जागृती केली जात आहे. कोरोनाचे लक्षण काय आहेत, कोरोनाचा प्रादूर्भाव कसा होतो? कोरोना रोखण्यासाठी काय करायचे? यासह गर्दीचे कार्यक्रम, राज्य आणि केंद्र सरकारकडून रद्द केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होळी कमी प्रमाणात खेळण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा -  स्वउत्पन्न वाढीवरुन विरोधक आक्रमक - कुठे ते वाचा

प्रशासनाकडून जागृती
जिल्हा प्रशासनाकडून हत्तीरोग दुरीकरन मोहिमे दरम्यान घरोघरी कोरोनाविषयी जागृती करण्यात येत आहे. तालुकास्तरावर मोठ- मोठे होर्डींग्ज तर प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र परिसरात बॅनरद्वारे जागृती केली जात आहे. राष्ट्रीय कॉलसेंटर, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष, टोल फ्री हेल्पलाईन नंबर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संपर्कनंबरद्वारे आवाहन करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आज अनेक मोबाईल ग्राहकांच्या डायलर टोन खोकण्याच्या आवाजात येत आहेत. सर्वप्रथम ही डायलर टोन जीयो कंपनीने आपल्या ग्राहकांच्या मोबाईलमध्ये टाकली आहे.

मोबालवर खोऽऽ खोऽऽऽ
एखाद्याला तुम्ही-आम्ही फोन केला की अगोदर त्या मोबाईल धारकाच्या पसंतीचा गाणं ऐकावयास मिळायचं परंतु मध्यरात्रीपासून अनेक मोबाईल ग्राहकांच्या डायलर टोनमध्ये खोऽऽ खोऽऽऽ असा आवाज ऐकायला मिळतो, त्यानंतर कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या सूचना दिल्या जातात. सोशल मिडियावरही कोरोना संदर्भत दक्षता व उपाय योजनांचे वादळ उठले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा रुग्णालयात नियंत्रण कक्ष, वार्डची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी खबरदारी बाबत दक्षता घ्यावी, घाबरण्याचे कारण नसल्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

येथे क्लिक करासचखंडच्या यात्री निवास कर्मचाऱ्यांत ‘कोरोना’ची धास्ती

शाळेच्या परिपाठामध्ये परिपत्रकाचे वाचन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी कोरोना विषयी खबरदारीच्या उपाय योजनांचे परिपत्रक जारी केले असून शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्हाभरातील शाळेच्या मुख्याध्यापकांना दररोज परिपाठामध्ये परिपत्रकाचे वाचन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे आदेश दिले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Open ...' On The Mobile Dial Tone. Nanded News