ट्रकमधून ११० मजूरांना पकडले

दिलीप गंभीरे
शनिवार, 28 मार्च 2020

कळंब शहरात पोलिसांनी हे ट्रक पकडले असून, या ट्रकमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आरोग्य तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कळंब (जि. उस्मानाबाद) : पुणे, सातारा जिल्ह्यातून गंगाखेडकडे (जि. परभणी) निघालेले दोन ट्रक कळंब पोलिसांनी शनिवारी (ता. २८) दुपारी पकडले. या ट्रकमधून ११० मजूर प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. सर्व जण मजुरीकरिता पुणे, साताराकडे गेले होते. लॉकडाऊनमुळे त्यांना गंगाखेड गावी जाण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून अन्न पाण्याविना हे मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले आहे. सर्वसामान्य नागरिक तर या कोरोना विषाणूच्या धास्तीने पूर्ण भयभीत झाले आहेत. पुणे, मुंबई आणि मोठ्या शहरांतून गावी येणाऱ्या नागरिकांचा लोंढा वाढला आहे.

कामधंदे बंद पडल्याने मोठ्या शहराकडून त्यांच्याच गावात येऊ दिले जात नसल्याच्या घटना घडत आहेत. शासनाने जिल्हा बंदी केली आहे तर वाहनेही बंद करण्यात आली आहेत. रस्त्यावर नागरिक दिसू नये, यासाठी महसूल, पोलिस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नागरिक भीतीपोटी शहरातून गावी जात आहेत. पायी, सायकल आणि मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत. 

दरम्यान पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काम करणारे कामगार शुक्रवारी (ता. २७) रात्री ट्रकमधून गावी जाण्यास निघाले होते. दोन ट्रक होते. त्यात जवळपास ११० महिला, पुरुष व लहान मुलेही होते. हे नागरिक गंगाखेड तालुक्यातील असल्याची माहिती देण्यात आहे. संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासन शहरामध्ये गस्त घालत बाहेर फिरणाऱ्यांना मज्जाव करीत आहेत.

हेही वाचा :  चाळीस किलोमीटर पायपीट करून गाठले बदनापूर 

घराबाहेर पडणाऱ्याची सखोल चौकशी करून सोडण्यात येत आहे. ट्रक, खासगी बसेसची तपासणी केली जात आहे. 
कळंब शहरातील पोलिस गस्त घालत असताना त्यांना दोन ट्रक दिसून आले. त्यांनी या ट्रकची पाहणी केली. त्यावेळी त्यात हे नागरिक गावी निघाले असल्याचे दिसून आले. त्या सर्वांना आता येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून आरोग्य तपासणी केल्याशिवाय गावाकडे जात येणार नसल्याचे पोलिसांनी त्या सर्व नागरिकांना सांगितले. 

कामे बंद झाली, अन्नही मिळेना 
ट्रकमधील सर्व नागरिक सातारा व पुण्यात मिळेल ते काम करत होते. मात्र, कोरोनामुळे अनेक कंपन्या आणि उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांचे कामे बंद झाली आहेत. हाताला कामधंदा नसल्याने त्यांच्या खाण्यापिण्याचे वांदे झाले आहे. त्यामुळे ते गावी निघाले असल्याचे नागरिक सांगत आहेत. 
पुण्यातून हे दोन ट्रक नागरिकांना घेऊन निघाल्यानंतर त्यांना कळंबपर्यत कोठेही कोणीही अडविले नाही किंवा त्यांची तपासणी केली नाही, असे ट्रकचालक माहिती देत आहेत. त्यामुळे पुणे ते कळंब मार्गावरील पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ट्रक मध्यरात्री पुण्यातून निघाले होते, असे ट्रकचालकांनी सांगितले. 

 

पुणे व सातारा जिल्ह्यांत मजुरीसाठी हे सर्व लोक गेले होते. कोरोनाच्या धास्तीने यांची रोजीरोटी बंद पडली. त्यामुळे दोन ट्रकमधून ११० नागरिक गंगाखेडकडे (जि. परभणी) निघाले होते. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 
- डॉ. जीवन वायदंडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कळंब 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad 110 Laborers Were Caught In The Truck Laborers