esakal | चाळीस किलोमीटर पायपीट करून गाठले बदनापूर
sakal

बोलून बातमी शोधा

बदनापूर :  शेंद्रा येथून पायपीट करून आलेले कामगार कुटुंब. 

कामासाठी घेऊन आलेला कंत्राटदार पळून गेल्याने त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. शिवाय खिशात पैसे देखील नसल्यामुळे त्यांना आपल्या गावी कसे जावे? असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत देखील त्यांनी ४० किलोमीटर पायपीट करून बदनापूर शहर गाठले. 

चाळीस किलोमीटर पायपीट करून गाठले बदनापूर

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघा देश लॉकडाऊन झाल्याने उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगार कुटुंबांचे हाल होत आहेत. असा काहीसा प्रसंग शेंद्रा (जि.औरंगाबाद) औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील १४ कामगार दाम्पत्य व त्यांच्या ११ लेकरांवर आला. त्यांना कामासाठी घेऊन आलेला कंत्राटदार पळून गेल्याने त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. शिवाय खिशात पैसे देखील नसल्यामुळे त्यांना आपल्या गावी कसे जावे? असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत देखील त्यांनी ४० किलोमीटर पायपीट करून बदनापूर शहर गाठले. तेव्हा बदनापूरकरांनी  माणुसकीचे दर्शन घडवत त्यांची जिल्हा परिषद शाळेत राहण्याची आणि जेवण्याची सोय केली. यासाठी नगरपंचायत व तहसिल प्रशासनाचे सहकार्य लाभले.

अवघ्या देशासह राज्यावर कोरोना विषाणूचे संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शासन, प्रशासन, सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी अवघा देश लॉकडाऊन करण्यात आला. त्यात आर्थिक नुकसान होणार असले तरी कोरोना पासून अनेकांचा जीव वाचणार आहे. मात्र भारत बंदचा फटका जसा उद्योगधंद्यांना बसत आहे, तसा हातावर पोट असलेल्या कामगार कुटुंबानाही बसत आहे. शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामासाठी परराज्यातून अनेक बिगारी कामगार आपल्या कुटुंबासह तात्पुरते पाल ठोकून वास्तव्यास आहेत. त्यांना मजूर कंत्राटदारामार्फत कामाचा मोबदला मिळतो.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांचे उत्पादन बंद झाल्याने परराज्यातील कामगारांना कंत्राटदाराने मदत करणे अपेक्षित आहे. मात्र कंत्राटदारच पळून गेल्याने मध्यप्रदेशातील १४ कामगार दाम्पत्य व त्यांची ११ लेकरे अशा एकूण ३९ जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिवाय आपल्या राज्यात गावी जायचे तर पदरात पैसे नाहीत. त्यामुळे काय करावे? अशा विवंचनेत ३९ जणांचे बिऱ्हाड शेंद्राहून ४० किलोमीटर पायी चालत बदनापूरला शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी पोचले. ही बाब बदनापूर पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा कामगारांनी त्यांची व्यथा सांगितली. यानंतर पोलिसांनी ही बाब नगरपंचायत प्रशासन आणि सुजाण नागरिकांना सांगितली.  

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

नगरपंचायतीचे अभियंता गणेश ठुबे यांच्या मार्फत नागरिकांनी त्या कामगार कुटुंबांची राहण्याची सोय जिल्हा परिषद शाळेत केली. प्रारंभी त्यांना चहा - बिस्कीट देऊन त्यांची आरोग्य तपासणीही केली. शाळेतील चार खोल्या या कुटुंबांना तात्पुरत्या राहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. बदनापूर येथील भाग्यश्री किराणा दुकानाचे मालक पुरुषोत्तम तापडिया यांनी अन्न - धान्य, तेल - मसाल्याची सोय करून दिली. त्यातून त्यांना शुक्रवारी (ता. २७) रात्रीचे जेवण देण्यात आले. तर शनिवारी (ता. २७) देखील त्यांची नाश्त्यापासून जेवणाची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती अमन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अकरम पठाण यांनी दिली. दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा झाली असून त्या मजुरांचे पुढील नियोजन तहसीलदार छाया पवार यांच्या मार्फत प्रशासन करणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटात अवघा देश असताना बदनापूर सारख्या अनेक नागरिकांनी माणुसकीचे नाते जपत संकटकाळात मदतीचा हात पुढे केला आहे, त्यामुळे संकटात सापडलेल्या लोकांना बळ मिळत आहे.

loading image